अर्धवट बांधकामाचे फोटो काढून निधी लाटला
By Admin | Updated: December 25, 2014 00:27 IST2014-12-25T00:27:54+5:302014-12-25T00:27:54+5:30
न झालेल्या पुलांचे काम पूर्ण झाले, अशी खोटी माहिती राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्र सरकारला दिल्याची माहिती कॅगने उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे ज्या पुलासाठी केंद्राने निधी दिला होता

अर्धवट बांधकामाचे फोटो काढून निधी लाटला
राज्याने केंद्राला दिली खोटी माहिती, प्रकल्प खर्च वाढविला
अतुल कुलकर्णी - नागपूर
न झालेल्या पुलांचे काम पूर्ण झाले, अशी खोटी माहिती राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्र सरकारला दिल्याची माहिती कॅगने उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे ज्या पुलासाठी केंद्राने निधी दिला होता त्या पुलाच्या अर्धवट कामाचे फोटो काढून केंद्राला पाठवण्यात आले. कॅगने त्या जागेवर जाऊन फोटो काढून घेतल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे.
परभणी जिल्ह्यातील सिरसी गावात गोदावरी नदीवर पुल बांधण्यासाठी सप्टेंबर १९९८ साली आदेश देण्यात आले होते. यासाठी राज्याच्या निधीतून ३.२४ कोटी मंजूर झाले होते. मात्र निधी टंचाईमुळे हे काम केंद्रीय मार्ग निधीतून करण्याचे ठरले. केंद्राने या कामासाठी ४.०५ कोटी रुपये फेब्रुवारी २००४ मध्ये मंजूर केले. कार्यकारी अभियंत्याने पुलासाठी पोच रस्ता बांधण्याचे काम ७३.७९ लाख रुपयांना नोव्हेंबर २००५ मध्ये दिले. केंद्राने निधी दिल्यानंतरही मंद गतीने हे काम चालू झाले. या कामावर २.३७ कोटी रुपये खर्च झाल्यानंतर हे काम संबंधीत कंत्राटदाराकडून नोव्हेंबर २००७ मध्ये काढून घेतले गेले. पुलाचेच काम झाले नाही तेव्हा पोच रस्त्याच्या कामाचे कंत्राट देखील २५.३० लाख रुपये खर्च केल्यानंतर आॅक्टोबर २०१० मध्ये रद्द केले गेले.
खरी कमाल येथून सुरु झाली. कंत्राट काढून घेतल्यानंतर जे उर्वरित काम १.३६ कोटीत पूर्ण होणार होते त्याची सुधारित किंमत आॅगस्ट २०११ मध्ये तब्बल ६.५६ कोटी रुपये करण्यात आली. पूल आणि पोच रस्त्याच्या कामाचे संमिश्र कंत्राट राज्य निधीमधून १८ महिन्यात पूर्ण करण्यासाठी या शिवाय जुलै २०१३ मध्ये ८.२३ कोटींना देण्यात आले. ऐवढे करुन जुलै २०१३ अखेर या कामावर ५९ लाख रुपये खर्च झाले. हे सगळे चालू असताना जानेवारी २०११ मधे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम २.७१ कोटीत संतोषजनकरित्या पूर्ण झाल्याचे कळवले. कळवताना पुलाच्या एका बाजूचे फोटो काढून दिले गेले. मात्र कॅगने जून २०१३ साली या कामाची प्रत्यक्ष पहाणीच केली तेव्हा तेथे ना पूल झाला होता ना त्याचा पोचमार्ग. सप्टेंबर १९९८ साली काम सुरु करण्यात आलेला हा पूल १५ वर्षानंतरही पूर्ण झाला नाहीच मात्र या कामात ६.८७ कोटींची वाढ मात्र झाली.
असाच प्रकार नरखेड तालुक्यातील जामगाव थडीपवनी मार्गावर वर्धा नदीवर मोठा पूल बांधण्याच्या कामात झाला. हे काम केंद्राच्या निधीतून पूर्ण करण्याचा प्रस्ताव मे २००८ साली सादर केला गेला. जून २०११ साली बांधकाम विभाग नागपूरच्या कार्यकारी अभियंत्यानी केंद्राला काम पूर्ण झाल्याचा अहवाल पाठवून दिला. मात्र मे २०१३ पर्यंत हे काम पूर्णच झालेले नव्हते!
असाच प्रकार आपेगाव, कुरनपिंपरी, महारटाकळी, चाकलांबा, शिंगरवाडी मार्गाच्या २२.२० कि.मी. रस्त्याच्या बाबतीत बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केला. काम पूर्ण झाले असे कळवण्यात आले प्रत्यक्षात काम अजूर्ण होते, व या कामावर झालेला ३.५२ कोटींचा खर्चही निष्फळ ठरला होता.