एअर इंडिया एअरलाइन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी विमान उड्डाणाच्या विलंबाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. "हा सतत चालणाऱ्या ट्रेंडचा एक भाग बनला आहे आणि ते अस्वीकार्य आहे" असं म्हणत सुप्रिया यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत पोस्ट केली आहे. "मी एअर इंडियाच्या फ्लाइट AI0508 मधून प्रवास करत आहे जे १ तास १९ मिनिटं उशिराने धावत आहे. हा सतत चालणाऱ्या ट्रेंडचा भाग बनला आहे, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. हे अस्वीकार्य आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांना विनंती आहे की, वारंवार होणाऱ्या विलंबासाठी एअर इंडियासारख्या विमान कंपन्यांना जबाबदार धरावं आणि प्रवाशांना चांगली सेवा मिळावी यासाठी कठोर नियम लागू करावेत."
"एअर इंडियाच्या विमानांना सतत विलंब होत आहे. हे अस्वीकार्य आहे. आम्ही प्रीमियम भाडं देतो, तरीही विमान कधीच वेळेवर येत नाहीत. या सततच्या गैरव्यवस्थापनामुळे व्यावसायिक, मुलं आणि ज्येष्ठ नागरिक... सर्वांनाच त्रास होत आहे. मी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना एअर इंडियावर कारवाई करण्याची विनंती करत आहे" असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एअर इंडियाने सुळे यांच्या पोस्टला उत्तर दिलं आहे. "विलंबांमुळे खूप निराशा होऊ शकते हे आम्ही समजू शकतो. मात्र काही वेळेस आमच्या नियंत्रणाबाहेरच्या ऑपरेशनल समस्या असतात ज्यामुळे विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो. मुंबईला जाणारं विमान अशाच एका समस्येमुळे एक तास उशिराने धावलं" असं एअर इंडियाने म्हटलं आहे.