पोपट मेलाच आहे; पण सांगायचे कुणी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 04:40 IST2017-01-14T04:40:39+5:302017-01-14T04:40:39+5:30
नाशिक शहरात सन २०१२च्या महापालिका निवडणुकीच्या वेळीच सेना-भाजपा युतीचा पोपट मेला आहे, पण आता २०१७ च्या निवडणुकीतही तो थडग्यातून पुन्हा उकरून

पोपट मेलाच आहे; पण सांगायचे कुणी?
धनंजय वाखारे / नाशिक
नाशिक शहरात सन २०१२च्या महापालिका निवडणुकीच्या वेळीच सेना-भाजपा युतीचा पोपट मेला आहे, पण आता २०१७ च्या निवडणुकीतही तो थडग्यातून पुन्हा उकरून काढत अर्धमेला झाला आहे, निपचित पडलेला आहे, असे सांगत युतीबाबत सेना-भाजपात एकमेकांना झुलवत ठेवले जात आहे. राज्यस्तरावर युतीबाबत खलबते सुरू असली तरी नाशिकमध्ये महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यास सेना-भाजपा ठाम आहे. फक्त युतीच्या या साऱ्या चर्चेत पोपट कधीच मेला आहे, हे सांगायचे कुणी, हा खरा प्रश्न आहे.
२०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत युती तोडण्यास भाजपानेच पुढाकार घेतला होता. त्या वेळी १२२ ठिकाणी उमेदवार देताना सेना-भाजपा या दोन्ही पक्षांची दमछाक झाली होती. निवडणुकीत भाजपाने आपल्या १४ जागा राखल्या होत्या, तर सेनेचे संख्याबळ कमी होऊन ते २२ वर आले होते. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत सेना-भाजपातून विस्तव गेला नाही आणि एकमेकांना विरोध करण्यातच उभयतांनी शक्ती खर्च केली. आता २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी सेना - भाजपाने स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी चालविली आहे. स्थानिक पातळीवर युतीच्या वावड्या उठविल्या जात असल्या तरी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी मात्र कोणत्याही परिस्थितीत युती करायची नाही, या मुद्द्यावर ठाम आहेत.
शहरात गेल्या पाच वर्षांत १२२ पैकी तब्बल ४२ नगरसेवकांनी पक्षांतरे केलेली आहेत आणि महापालिकेच्या इतिहासात ही सर्वात मोठ्या प्रमाणावर पक्षांतराची लाट ठरली आहे. त्यात शिवसेनेत तब्बल २४, तर भाजपात १८ नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे यातील काही अपवाद वगळता सर्वांना तिकिटे देण्याचे आव्हान उभयतांपुढे आहे.
यदाकदाचित वरिष्ठ स्तरावरून युतीचा संदेश आल्यास सेना-भाजपात तिकिटावरून मोठी दुफळी माजण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे स्थानिक पदाधिकारी व इच्छुकांकडूनही युती न होण्याचीच मानसिकता दर्शविली जात आहे.