रेल्वेस्थानकातील पार्किंग असुरक्षितच!
By Admin | Updated: November 18, 2014 00:53 IST2014-11-18T00:53:20+5:302014-11-18T00:53:20+5:30
नागपूर रेल्वेस्थानक दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर आहे. परंतु असे असताना रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेसाठी कुठलीच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. अनेक शहरात पार्किंगमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची उदाहरणे आहेत.

रेल्वेस्थानकातील पार्किंग असुरक्षितच!
‘सीसीटीव्ही’चा अभाव : रेल्वे प्रशासनाची उदासीनता, अनेकदा मिळाली स्फोटांची धमकी
दयानंद पाईकराव - नागपूर
नागपूर रेल्वेस्थानक दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर आहे. परंतु असे असताना रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेसाठी कुठलीच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. अनेक शहरात पार्किंगमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु हजारो प्रवासी ये-जा करीत असलेल्या नागपूर रेल्वेस्थानकावर एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले असून रेल्वे प्रशासनाकडून पार्किंगच्या कंत्राटदारांना सीसीटीव्ही लावण्याबाबत कुठल्याच सूचना करण्यात येत नसल्याची धक्कादायक माहिती आहे.
नागपूर रेल्वेस्थानक हे देशातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज १३५ ते १५० रेल्वेगाड्या ये-जा करतात. यात प्रवाशांची संख्याही ५० हजारावर जाते. रेल्वेस्थानकाच्या पार्किंग परिसरातही असंख्य प्रवासी उभे असतात. अनेकदा रेल्वेस्थानकावर बॉम्बस्फोट घडविण्याचे पत्रही लोहमार्ग पोलिसांना मिळाले आहे. परंतु असे असताना रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेप्रति सुरक्षा यंत्रणेत आणि रेल्वे प्रशासनात कमालीची उदासीनता दिसून येते. अनेक शहरात पार्किंगच्या परिसरातील वाहनांमध्ये बॉम्ब ठेवून स्फोट घडवून आणल्याची उदाहरणे आहेत. परंतु यावरून रेल्वे प्रशासनाने कुठलाच धडा घेतलेला दिसून येत नाही. रेल्वे प्रशासनाकडून पार्किंगचे कंत्राट देताना त्यांना सीसीटीव्ही लावण्याबाबत कुठलीच सक्ती करण्यात येत नसल्याची माहिती आहे. यामुळे कुठल्याही क्षणी काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी घटना घडल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग येणार की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर पूर्वेकडील संत्रा मार्केट परिसरातील दुचाकीच्या पार्किंगचे कंत्राट असलेल्या कंत्राटदाराने स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले आहेत. मात्र, पश्चिमेकडील भागात रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यासमोरील भागातील पार्किंगमध्ये तसेच लोहमार्ग पोलीस ठाण्यासमोरील पार्किंगमध्ये सीसीटीव्हीच नसल्यामुळे ही धोक्याची बाब आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर सर्वात अधिक प्रवासी पश्चिमेकडील भागातून येतात. त्यामुळे या भागातील पार्किंगवर विशेषत्वाने लक्ष देण्याची गरज असताना रेल्वे प्रशासनाला मात्र पार्किंगमध्ये घडू शकणाऱ्या घटनेचा साधा अंदाजही आला नसल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)