पार्किंगची गहन समस्या सुटणार?

By Admin | Updated: January 30, 2015 05:21 IST2015-01-30T05:21:36+5:302015-01-30T05:21:36+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात पार्किंग समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असून, यातून मार्ग काढण्यात शासनालाही अपयश आले आहे

Parking intensive problem? | पार्किंगची गहन समस्या सुटणार?

पार्किंगची गहन समस्या सुटणार?

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पार्किंग समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असून, यातून मार्ग काढण्यात शासनालाही अपयश आले आहे. दक्षिण मुंबईत तर या समस्येने उचल खाल्ली आहे. हे पाहता पार्किंगसाठी अन्य जागा उपलब्ध होते का याची चाचपणी वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे. यासाठी बीपीटीच्या (मुंबई पोर्ट ट्रस्ट) जागांचा वापर होऊ शकतो का यावर विचार सुरू असून, त्यासंदर्भात बीपीटी व्यवस्थापनासोबत बैठकाही झाल्या आहेत.
दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात सरकारी आणि खासगी कार्यालये, व्यापारी संकुले, कॉलेज आणि शाळा आहेत. त्यामुळे या भागात दिवसभर वाहनांची वर्दळ असते. कार्यालये आणि व्यवसायाची वाढलेली संख्या पाहता वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येते. या भागाला गेल्या काही वर्षांत पार्किंगच्या समस्येनेही मोठ्या प्रमाणात ग्रासले असून, या पार्किंगमुळेच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याचे वाहतूक पोलीस सांगतात. मोहम्मद अली रोड परिसरात पार्किंग केलेल्या वाहनांमुळे अन्य वाहनांना मार्ग काढताना तर अक्षरश: कसरत करावी लागते. त्यातच अवजड वाहनांचीही भर पडत असल्याने मोठी डोकेदुखीच ठरते. त्यामुळे या पार्किंगवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. दक्षिण मुंबईत जवळपास २0 हजार गाड्यांना पार्किंगसाठी जागाच नसल्याचे समोर आले आहे. वाहतूक पोलिसांनी केलेल्या अभ्यास अहवालातून ही बाब समोर आली आहे. यात दुचाकी, तीन आणि चार चाकी वाहनांबरोबरच अवजड वाहनांचाही समावेश आहे. त्यामुळे पार्किंगचा तिढा थोडाफार तरी सुटावा यासाठी बीपीटीच्या काही मोकळ्या पण वापरात नसलेल्या जागा पार्किंगसाठी उपलब्ध होतात का याची चाचपणी सुरू आहे.
यासंदर्भात वाहतूक पोलीस आणि बीपीटी व्यवस्थापन यांच्यात दोन बैठकाही झाल्या आहेत. यात बीपीटीने त्यांच्या काही मोकळ्या जागा पार्किंगसाठी वापर करण्यासाठी दिल्यास मोठी समस्या दूर होऊ शकते, असे मत वाहतूक पोलिसांकडून मांडण्यात आले होते. यावर बीपीटीकडून अद्याप विचार केला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Parking intensive problem?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.