पालकांनी आत्मचिंतन करण्याची गरज

By Admin | Updated: August 22, 2015 23:45 IST2015-08-22T23:45:21+5:302015-08-22T23:45:21+5:30

महाराष्ट्रातल्या पालकांसाठी, पोलिसांसाठी याहून गंभीर बाब ही की इथल्या देशभरातील गुन्हेगारीचे विश्लेषण करणाऱ्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने नुकतीच 2014 या वर्षाची आकडेवारी जाहीर केली.

Parents need to be self-explanatory | पालकांनी आत्मचिंतन करण्याची गरज

पालकांनी आत्मचिंतन करण्याची गरज

- जयेश शिरसाट

पंखाखालच्या बालकांकडून सर्वाधिक गुन्हे !
महाराष्ट्रातल्या पालकांसाठी, पोलिसांसाठी याहून गंभीर बाब ही की इथल्या देशभरातील गुन्हेगारीचे विश्लेषण करणाऱ्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने नुकतीच  2014 या वर्षाची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार धक्कादायक निरीक्षण समोर आले. त्यातले सर्वात महत्त्वाचे निरीक्षण हे की देशभरात कारवाई झालेल्या विधिसंघर्ष बालकांपैकी सुमारे 80% पालकांसोबत राहतात.

दोनेक वर्षांपूर्वी भांडुपमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना. नववीची परीक्षा संपली. सुट्या लागल्या. दहावीचा अभ्यास करण्याऐवजी तुषार (बदललेले नाव) मात्र मित्रांमध्ये गुंतला. मित्रांच्या संगतीत त्याला गांजा ओढण्याचे व्यसन जडले. म्हाताऱ्या आजीसोबत राहणारा तुषार दिवसेंदिवस गांजात रुतू लागला. दिवसभर त्याला एकच चिंता सतावे. आजचा स्टॉक घेण्यासाठी पैसे कुठून आणायचे? एकदा त्याने आजीकडे पैशांची मागणी केली. तिने कशासाठी विचारले. तुषारने आढेवेढे घेतले. आजीला संशय आला. तिने पैसे नाकारले. मात्र गांजाची तल्लफ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. याच नशेपोटी तुषारने गाढ झोपलेल्या आजीचे दोन्ही कान कापले आणि सोन्याचे कानातले दागिने पळवले. हे कानातले विकून त्याने गांजाची नशा केली. शेजाऱ्यांनी वेळीच आजीला रुग्णालयात दाखल केले, म्हणून तिचा जीव वाचला. मात्र तिच्या मनावर झालेली जखम आजही भळभळते आहे. आई-वडील नसल्याने तुषारला आजीनेच वाढवले. पण त्यानेच असा घात केल्याची तिला टोचणी लागली होती. या घटनेने पोलीसही शहारले.
दोन वर्षांपूर्वी मुंबईतल्या शक्ती मिलमध्ये दोन तरुणींवर सामूहिक बलात्कार घडले. यामधले दोन आरोपी अल्पवयीन होते. दिल्लीतल्या निर्भया बलात्कारातही अल्पवयीन आरोपींचा सहभाग होता. चार वर्षांपूर्वी स्पोटर््स बाईक घेण्यास विरोध करणाऱ्या आजीची अल्पवयीन नातवाने मित्राच्या मदतीने हत्या केली होती. गंभीर बाब ही की देशभरात कमीअधिक प्रमाणात लहान मुलांकडून सातत्याने गुन्हे घडत आहेत. असे करणाऱ्या अल्पवयीन मुलांना विधिसंघर्ष बालक म्हणतात. २०१३मध्ये एकूण गुन्हेगारीत विधिसंघर्ष बालकांकडून घडलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण १.२ टक्के इतके होते. २०१४मध्ये हे प्रमाण कमी होणे अपेक्षित होते. मात्र लोकसंख्यावाढीनुसार गुन्हे घडण्याचे प्रमाणही वाढते आहे. लहान मुलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या प्रथम या संस्थेचे प्रकल्प संचालक किशोर भामरे मात्र पालकांना यासाठी जबाबदार धरतात. ते म्हणतात की टीव्ही, इंटरनेट, सोशल मीडिया ही माध्यमे सहजपणे लहान मुलांच्या हाती लागतात. त्यातून होणारा अनावश्यक गोष्टींचा मारा मुलांवर होतो. हल्ली विभक्त कुटुंब पद्धती वाढल्याने मुलांशी पालकांचा संवाद खुंटला आहे. मुले काय करतात, कुठे जातात, त्यांचे मित्र कोण यावर लक्ष व नियंत्रण नाही. यामुळे मुले पालकांपासून आपोआपच लांब जातात. त्यामुळे पालकांनीच आत्मकेंद्रित होऊन विचार करण्याची गरज आहे. व्यवस्था, शासन, पोलीस, न्यायालयांनीही बालगुन्हेगारी हा विषय गांभीर्याने हाताळायलाच हवा. पण सतर्क नागरिक म्हणून सर्वांनीच पुढाकार घेऊन नजरेला पडणारे लहान मुलांचे गुन्हे त्या त्या वेळी रोखणे आवश्यक बनले आहे.

सर्वाधिक हिंसक गुन्हे : विधिसंघर्ष बालकांकडून सर्वाधिक हिंसक व गंभीर गुन्हे घडले आहेत. पोलीस कारवाई झालेल्यांमध्येही महाराष्ट्र पुढे आहे. हत्या, हत्येचे प्रयत्न, दंगली, गंभीर मारहाण, दरोडे, दरोड्यांसह हत्या, दरोड्याची तयारी, लूटमार, चोरी, विनयभंग अशाप्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या बालकांचा सर्वाधिक सहभाग समोर आला आहे. बलात्कार, छेडछाड, शारीरिक छळ यातही महाराष्ट्रातील बालके पुढे आहेत.पोलिसांनुसार बालगुन्हेगारीला विभक्त कुटुंब, आईवडिलांमधील तंटे, त्यांच्या संगोपन, संस्कारातील त्रुटी, निरक्षरता, घरातले वातावरण, आर्थिक परिस्थिती अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.

48,230 देशात बालकांवर कारवाई झाली.

38,693 बालक पालकांच्या पंखाखालचे आहेत.

7,905  बालक अन्य नातेवाईक किंवा सांभाळ करणाऱ्यांसोबत वास्तव्यास आहेत.

1632  इतके बेघर आहेत. आजवरचे निरीक्षण हे की पालकांच्या छत्रछायेखाली नसलेली, अनाथ मुले वाईट वळणाला लागतात. त्यांच्यात गुन्हेगारी वृत्ती बळावते. प्रत्यक्षात या आकडेवारीवरून सर्वाधिक गुन्हे आईवडिलांच्या सोबत राहणाऱ्यांकडून घडल्याचे स्पष्ट होते.

38,565 गुन्हे विधिसंघर्ष बालकांकडून संपूर्ण देशात घडले आहेत. यात भारतीय दंडविधानासह स्थानिक कायद्यांनुसार दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा सहभाग आहे. देशात सर्वप्रकारच्या गुन्हेगारीत बालकांकडून घडलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण १.२ टक्के आहे. तर देशात बालगुन्हेगारीचा दर २.७ टक्के इतका आहे.

 

Web Title: Parents need to be self-explanatory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.