परभणी : शहरातील आनंदनगरामध्ये रविवारी सकाळी दहाच्या सुमारास अचानक झालेल्या एका स्फोटात युवकाचा मृत्यू झाला. दरम्यान, हा स्फोट आहे की अन्य काही प्रकार याबाबत दिवसभर पोलिसांचा तपास सुरू होता. सायंकाळी विशेष पोलिस महानिरीक्षक अमितेशकुमार यांनीही घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. आनंदनगरातील प्रा.एल.एम. करंजकर यांच्या घरी वरच्या मजल्यावर अतुल व अमोल वाघमारे हे जुळे भाऊ त्यांच्या दोन चुलत भावांसमवेत किरायाने राहत होते. अतुल भगवान वाघमारे (२९) हे अंबाजोगाई येथील योगेश्वरी पॉलेटेक्नीकमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तीन दिवसांपूर्वीच ते परभणीत आले होते. रविवारी सकाळी १० च्या सुमारास अतुल एकटेच खोलीत होते. अचानक खोलीतून आग व धुराचे लोट दिसले. त्यातच एका खिडकीचे तावदाने फुटले. धुरामुळे संपूर्ण खोली काळी झाली होती तर कागदपत्र व अन्य साहित्य जळालेल्या अवस्थेत होते. या घटनेत अतुल वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला. खोलीतून धूर येत असल्याने शेजारच्यांना ही गोष्ट लक्षात आली. अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. बॉम्बशोधक नाशक, श्वानपथक, नवा मोंढा पोलिस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी भगवान शंकरराव वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन रात्री उशिरा नवा मोंढा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. दरम्यान, हा प्रकार स्फोटाचा नसून आत्महत्येचा असावा, असा संशय पोलिसांनी रात्री व्यक्त केला. (प्रतिनिधी)
परभणीमध्ये स्फोटात युवकाचा मृत्यू !
By admin | Updated: February 2, 2015 04:34 IST