‘समांतर राष्ट्रवादी’ला लवकरच मान्यता
By Admin | Updated: March 6, 2017 00:43 IST2017-03-06T00:43:19+5:302017-03-06T00:43:19+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर मी समांतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची घोषणा केली.

‘समांतर राष्ट्रवादी’ला लवकरच मान्यता
वडगाव मावळ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर मी समांतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची घोषणा केली. तत्पूर्वी मी पक्षाचा राजीनामा प्रदेशाकडे दिला असून तालुका राष्ट्रवादीच्या बैठकीत माझ्या निलंबनाचा ठराव करण्याचा प्रश्नच येत नाही. जे पक्षाचे प्राथमिक व क्रियाशील सभासद नाही अशांना निलंबनाचा ठराव करण्याचा अधिकार नाही. अशा या पारावरच्या गावगुंडी करणाऱ्यांना प्रथम हाकला, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांनी आपल्यावरील निलंबनाच्या ठरावास पत्रकार परिषदेत उत्तर दिले.
मावळ राष्ट्रवादीच्या येथे झालेल्या चिंतन बैठकीत दाभाडे यांनी पक्षविरोधी प्रचार केल्याने पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव झाला असा ठपका ठेवून त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करावे, असा ठराव एकमताने करण्यात आला होता. त्यास उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेस संत तुकाराम सहकारी कारखान्याचे संचालक अंकुश आंबेकर, सरपंच दत्तात्रय पडवळ, नारायण ठाकर, दत्तात्रय आंद्रे, तुकाराम असवले, शांताराम लष्करी, सरपंच विठ्ठल जाधव, कैलास खांडभोर, सुनील दाभाडे, कैलास गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
दाभाडे यांनी समांतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची घोषणा करून पक्षाची येत्या आठ-दहा दिवसांत निवडणूक आयोगाकडे प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी पक्षाचे कार्यक्षेत्र मावळ तालुका, त्यानंतर जिल्हा व राज्य पातळीवर कार्यविस्तार करण्यात येईल.