पप्पू गणवीर हत्याकांड, कुख्यात दद्दया पुजारी टोळीवर मोक्का
By Admin | Updated: September 8, 2016 18:35 IST2016-09-08T18:35:57+5:302016-09-08T18:35:57+5:30
सक्करद-यातील कुख्यात गुंड दद्दया ऊर्फ सागर प्रकाश पुजारी (वय २०) याच्यावर आणि त्याच्या टोळीतील गुंडांवर मोक्का लावण्यात आला आहे.

पप्पू गणवीर हत्याकांड, कुख्यात दद्दया पुजारी टोळीवर मोक्का
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 8 - विविध गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला सक्करद-यातील कुख्यात गुंड दद्दया ऊर्फ सागर प्रकाश पुजारी (वय २०) याच्यावर आणि त्याच्या टोळीतील गुंडांवर मोक्का लावण्यात आला आहे.
कुख्यात दद्दया ऊर्फ सागर पुजारी, सोनू ऊर्फ गेंद्या राजकुमार दांडेकर (वय १९), शाका ऊर्फ आकाश संपतराव लिल्हारे (वय १८) आणि शूटर ऊर्फ शूभम शामू नेवारे (वय २०, रा. सेवादल नगर, भांडेप्लाट) तसेच त्यांचा एक अल्पवयीन साथीदार या सर्वांनी ११ मार्च २०१६ला रात्री अजनीतील मेडिकल चौकाजवळ लक्ष्मी बारच्या समोर क्षुल्लक कारणावरून पप्पू उर्फ विनयचंद्र चंद्रमणी गणवीर (वय २४) याचा निर्घृण खून केला होता.
या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर अजनी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. बारच्या सीसीटीव्हीत अॅक्टिव्हावर आरोपी पळून जाताना दिसत होते. मात्र, रात्रीची वेळ असल्याने आरोपींचे चेहरे काही स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळे आरोपीचा छडा काही केल्या लागत नव्हता. तब्बल ५ महिन्यांनी या आरोपींच्या मुसक्या बांधण्यात गुन्हेशाखेच्या पथकाला यश मिळाले.
१८ आॅगस्टला दद्याच्या साथीदारांना आणि त्यानंतर दद्दयाला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांचा गुन्हेगारी अहवाल पोलिसांच्या हाती लागला. कुख्यात दद्या आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) १९९९ नुसार कारवाई करण्यात यावी, यासाठी अजनीचे ठाणेदार सांदिपान पवार आणि सहायक आयुक्त एस. डी. राठोड यांनी वरिष्ठांकडे कागदोपत्र पाठविले होते. त्याला मंजुरी मिळाली.