पालिकेत पेपरलेस काम व्हायला पाहिजे
By Admin | Updated: August 22, 2016 01:17 IST2016-08-22T01:17:18+5:302016-08-22T01:17:18+5:30
आधुनिक तंत्रज्ञान व संगणकाचा वापर करून कार्यालयात पेपरलेस काम व्हायला पाहिजे

पालिकेत पेपरलेस काम व्हायला पाहिजे
पिंपरी : आधुनिक तंत्रज्ञान व संगणकाचा वापर करून कार्यालयात पेपरलेस काम व्हायला पाहिजे, कार्यालयातील फाईलची संख्या कमीत कमी झाल्या पाहिजेत, असे मत आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकारामनगर येथे माहिती व तंत्रज्ञान दिवस
साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी सायबर सेक्युरिटी तंत्रज्ञानचे प्रमुख हेरॉल्ड डी कॉस्टा, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सुक्ष्म विश्लेषक (स्कॅनिंग) हेमंत गुडे, वैद्यकीय अधीक्षक मनोज देशमुख, मनोविकृती चिकित्सक किशोर गुजर, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, अनिता कोटलवार व संगणक संवर्गातील कॉम्प्युटर आॅपरेटर, प्रोग्रामर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
हेरॉल्ड डी कॉस्टा म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिका माहिती व तंत्रज्ञान सेवेमध्ये अग्रेसर आहे. पालिकेच्या सर्व्हर रूममध्ये गेल्यानंतर वेगळी अनुभूती मिळते. मी या शहराचा एक भाग असल्याचे मला समाधान मिळते.’’ या वेळी महापौर शकुंतला धराडे यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी प्रास्ताविक केले. माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले. तर आयटी विभागाचे सुधीर बोराडे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
>डिजिटलायजेशन : मनपा उत्पन्नात होईल वाढ
विविध खासगी कंपन्यांमध्ये संगणकीय प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करुन डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असतो. त्याचप्रमाणे महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेत देखील अशा प्रकारचा प्रयत्न व्हावा, नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सर्व सेवासुविधा एकाच ठिकाणाहून दिल्यास महानगरपालिकेच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होईल, असे आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले.