पेपरफुटीस शिक्षक जबाबदार
By Admin | Updated: March 11, 2015 01:41 IST2015-03-11T01:41:56+5:302015-03-11T01:41:56+5:30
शहरातील न्यू हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर शिक्षकांनीच दहावीच्या बीजगणिताचा पेपर फोडल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला.

पेपरफुटीस शिक्षक जबाबदार
कन्नड (जि. औरंगाबाद) : शहरातील न्यू हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर शिक्षकांनीच दहावीच्या बीजगणिताचा पेपर फोडल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी संतोष दादासाहेब गायके, राजेंद्र चिंधा वाणी, अरुण भिकनराव सोनवणे आणि सचिन शिवाजी भामरे या शिक्षकांना अटक केली आहे. एस. पी. दाभाडे हा शिक्षक फरार आहे.
न्यू हायस्कूल या परीक्षा केंद्रावर दोनशे विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. मंगळवारी ११ वाजता बीजगणिताचा पेपर होता. केंद्रप्रमुख डी. सी. मिस्तरी यांनी कस्टोडियनकडून प्रश्नपत्रिकांचे लिफाफे आणले व सहकेंद्रसंचालक एस. एस. घायतडक यांच्याकडे सुपूर्द केले. या प्रश्नपत्रिकांची विभागणी करण्यासाठी घायतडक यांनी वरील शिक्षकांची मदत घेतली. त्याचवेळी या शिक्षकांनी पेपर फोडला. ही माहिती मिळताच सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलिसांनी केंद्रात प्रवेश केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. संतोष गायके हे स्टोअर रूममध्ये गणिताची ‘ए’ भागाची प्रश्नपत्रिका हातात घेऊन प्रश्नांची उत्तरे सांगत होते, तर याच शाळेतील राजेंद्रवाणी, अरुण सोनवणे व सचिन भामरे हे कार्बन टाकून चार प्रतीत कॉप्या लिहीत होते. एस. पी. दाभाडे याने ‘ए’ संचातून प्रश्नपत्रिका फोडून या चौघांच्या ताब्यात दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. वरील चार शिक्षकांना अटक केली असून, दाभाडे फरार आहे. पोलिसांनी ही माहिती तहसीलदार महेश सुधळकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतम यावलकर यांना कळविली. इत्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती परीक्षा मंडळ औरंगाबाद यांना कळविली. घडलेल्या प्रकाराबाबतची फिर्याद देण्यास कुणीही पुढे येत नव्हते. फिर्याद देण्यास कुणीही तयार नसेल, तर सरकारच्या वतीने पोलीसच फिर्यादी होतील हे स्पष्ट झाल्यानंतर केंद्रसंचालक डी. सी. मिस्तरी यांनी फिर्याद दिली.