कोंडी फोडण्याच्या अहवालांचा पुन्हा कागदी खेळ
By Admin | Updated: March 7, 2017 00:08 IST2017-03-06T04:05:10+5:302017-03-07T00:08:04+5:30
झोपी गेलेल्या माणसाला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना जागे करता येत नाही.

कोंडी फोडण्याच्या अहवालांचा पुन्हा कागदी खेळ
झोपी गेलेल्या माणसाला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना जागे करता येत नाही. असे पालिका, पोलीस, आरटीओ यांचे झाले आहे. कोंडी होते, हे दिसत असले तरी प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, पण दुसरी यंत्रणा सहकार्य करीत नाही, असे म्हणून आपल्यावरील जबाबदारी झटकून पुन्हा डोळ्यांना झापडं बांधायची, असा खेळ सुरू आहे. हा खेळ आता बंद करा. अन्यथा, सामान्य माणूस पेटून उठला तर तो काहीही करू शकतो. त्याची जबाबदारी यंत्रणेवरच असेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. शहरात कोंडी वाढते म्हणून डोंबिवलीत एसटीला प्रवेश बंद आणि कंपन्यांच्या बसला मुक्त प्रवेश... शाळा सुटण्याच्या वेळेला किंवा संध्याकाळी कोंडी होते तेव्हा एकही यंत्रणा जागयवर नाही असे किती काळ चालणार? पश्चिमेतून रेतीचे ट्रक जाताना टंडन रोडवर रात्रभर आडोश्याला उभे राहून व्यवहार करणाऱ्यांना तोच रस्ता दिवसभर गर्दीने ओसंडून वाहात असतो याचा मात्र विसर पडतो. तुम्ही डोळे बांधून सोंग आणले, तरी कल्याण-डोंबिवलीकरांचे डोळे उघडे आहेत, याचे तरी भान ठेवा.
कल्याणप्रमाणेच डोंबिवलीतील परिस्थिती फार वेगळी नाही. डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर हा एकमेव पूल आहे. कल्याणमध्ये पत्रीपूल असो अथवा वालधुनी उड्डाणपूल, या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर कोंडीचे चित्र कायम असते. डोंबिवलीला थेट ठाणे-मुंबईशी जोडणाऱ्या बहुचर्चित अशा मोठागाव-ठाकुर्ली-माणकोली खाडी पुलाच्या कामाचे भूमिपूजन होऊन पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. भूमिपूजनाच्या श्रेयाच्या लढाईत सत्ताधारी शिवसेना-भाजपाने स्वतंत्रपणे कार्यक्रम आटोपला खरा. पण, पुढील कामाचे काय झाले? कामाबाबतची तत्परता कुठे गेली? असे सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
कल्याणमधील पत्रीपूल ते दुर्गाडी चौक मार्गावरील वाहतूककोंडीवर उपाय म्हणून तयार करण्यात आलेला गोविंदवाडी बायपास अनेक वर्षे लोटूनही अद्याप खुला झालेला नाही. श्रेयासाठी धडपडणारे राजकारणी गेले कुणीकडे, असे काहीसे म्हणण्याची वेळ कल्याण-डोंबिवलीकरांवर येऊन ठेपली आहे. वाढती वाहतूककोंडीची समस्या पाहता पुन्हा एकदा प्रशासनाला जाग आली असून पुनश्च वाहतूक आराखडा तयार करण्याचे ठरवले आहे.
दरम्यान, यापूर्वीचे आराखडे, आरटीओने बेकायदा रिक्षातळप्रकरणी सादर केलेला सर्वेक्षण अहवाल, वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी करण्यात आलेले महापालिकेतील ठराव, यांचे काय झाले? त्यांच्या अंमलबजावणीचे घोडे अखेर अडले कुठे, असे सवाल एकंदरीतच परिस्थिती पाहता निर्माण झाले आहे. याची गांभीर्याने दखल घेण्याची आता वेळ आली असून अन्यथा भविष्यात कल्याण-डोंबिवलीकरांच्या सहनशीलतेची जागा उद्रेकाने घेतल्यास संबंधित यंत्रणा जबाबदार राहील, यात शंका नाही.
>आमची कारवाई सुरूच
बेशिस्त रिक्षाचालक आणि बेकायदा वाहतुकीविरोधात आमची कारवाई सुरूच असते, असा दावा वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाबासाहेब आव्हाड यांनी केला आहे. अवजड वाहनांना ठरावीक वेळेत बंधन घातले असून नियम मोडल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाते. रस्त्यांची कामे तसेच महापालिकेकडून उपलब्ध होणाऱ्या सुविधांची वानवा, हे देखील वाहतूककोंडीला कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
>बेकायदा रिक्षातळ ‘नजरेआड’
वाहतुकीची समस्या दिवसागणिक गंभीर होत असताना चौकाचौकांत उभ्या राहिलेल्या आणि वाहतूककोंडीला हातभार लावणाऱ्या बेकायदा रिक्षातळांवरील कारवाईकडे मात्र पुरते दुर्लक्ष झाले, हे वास्तव आहे. प्रवाशांशी उद्धट वर्तन, भाडे नाकारणे ही मुजोरी नित्याचीच बाब झाली असताना कल्याणमध्ये एका रिक्षाचालकाने बसचालकाला केलेल्या मारहाणीवरून याची प्रचीती आली आहे.
दरम्यान, रिक्षाचालकांनी मुख्य चौकांसह गल्लीबोळांत उभ्या केलेल्या या बेकायदा रिक्षातळांना राजकीय अभय लाभले आहे. रिक्षा संघटनांचे अध्यक्ष हे राजकीय पक्षांशी निगडित असल्याने या पुढाऱ्यांच्या आशीर्वादात
शहराला बकालपणाची अवकळा आली आहे. एकीकडे विकासाच्या बाता करायच्या, तर दुसरीकडे बेकायदा कृत्यांना आणि बेशिस्तीला अभय देऊन शहर विकासात बाधा आणायची, अशी राजकीय नेत्यांची दुटप्पी भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.
डोंबिवलीचा आढावा घेता येथील इंदिरा गांधी चौकाला बेकायदा रिक्षातळांचा विळखा पडला असून केडीएमटीच्या बस उभ्या करण्यासाठीही चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. शहरातील मुख्य चौक तसेच रस्ते जणू काही रिक्षाचालकांसाठी आंदण दिल्याचे डोंबिवलीसह कल्याणमध्येही पाहायला मिळते. विशेष बाब म्हणजे शहरात कोणत्या ठिकाणी किती रिक्षांसाठी तळ मंजूर करायचे, ही जबाबदारी आरटीओची आहे. तर, ते उभारण्यासंदर्भात परवानगी देण्याची जबाबदारी महापालिकेची असते. त्यामुळे यामध्ये मुख्य जबाबदारी दोघांचीही असताना आरटीओने सुमारे दीड वर्षापूर्वी सर्वेक्षण करून रिक्षातळांचा अहवाल महापालिकेला सादर केला आहे. अद्याप अहवालाची अंमलबजावणी झालेली नाही.
टिटवाळ्यातही बोजवारा
श्री गणपतीचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या आणि केडीएमसीच्या अखत्यारीत येणाऱ्या टिटवाळ्यातही वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. रेल्वे स्थानक ते गणेश मंदिर रोड या रस्त्याचे सिमेंट-काँक्रिटीकरणाचे २०११ च्या अखेरीस सुरू झालेले काम अद्याप पूर्ण झालेले नाही. रेल्वे स्थानक परिसरात रुंदीकरण झाले, मात्र पुढील कार्यवाही थंडावल्याने रुंदीकरणानंतरही संबंधित रस्ता वाहतुकीसाठी निरुपयोगी असाच ठरत आहे. दुसरीकडे या ठिकाणी ना फेरीवाला क्षेत्र असूनही बिनदिक्कतपणे फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. येथील रिक्षाचालक आणि टांग्यांची बेशिस्तही याला कारणीभूत ठरत आहे. भाडे आपल्यालाच मिळावे, या हेतूने स्थानक परिसरात त्यांचा पडलेला विळखा एक प्रकारे वाहतुकीला बाधा ठरली आहे.
बेकायदा तळांचा अहवाल केडीएमसीकडे
कल्याण-डोंबिवलीतील तळांसाठी आम्ही आॅक्टोबर २०१५ मध्ये सर्वेक्षण केले आहे. त्याचा अहवाल केडीएमसीकडे पाठवला आहे. त्याला एमएमआरटीएची मान्यताही आवश्यक आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्हाला कारवाईचे उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे. त्याप्रमाणे आमची कारवाई सुरूच असते. त्यामुळे आरटीओ दुर्लक्ष करते, असे म्हणणे चुकीचे असल्याचे कल्याण आरटीओचे अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी सांगितले. जनजागृतीपर उपक्रमदेखील आमच्याकडून राबवले जातात. अपुऱ्या संख्याबळातदेखील आमची कारवाई सुरू असून जानेवारी २०१७ पर्यंत आम्ही दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ७८ लाखांचा महसूल जमा केला असल्याचे नाईक यांनी सांगितले.
‘शहर लवकरच कोंडीमुक्त’
आजघडीला दोन्ही शहरांमध्ये वाहतूककोंडी आहे, यात दुमत नाही. परंतु, लवकरच हे चित्र बदलेल, असा दावा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केला आहे. शहरातील काही उड्डाणपुलांची कामे सुरू असून काहींच्या कामांना लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. सिमेंट-क्राँकिटीकरणाची संथ गतीने सुरू असलेली बहुतांश कामे पूर्णत्वाला आलेली असून ती एप्रिलअखेरपर्यंत मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच शहरातील पार्किंग धोरण महापालिकेकडून निश्चित केले जाणार असल्याने कोंडीचा प्रश्न बराचसा मार्गी लागेल, असे देवळेकर यांनी सांगितले. गोविंदवाडी बायपास खुला झाला नसला तरी त्याचा वापर सुरू झाला आहे. तत्काळ आणि दूरगामी उपाययोजना अमलात आणण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू झालेली असून याचे चांगले परिणाम कल्याण-डोंबिवलीकरांना दिसून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
वाहने कुठे उभी करायची?
आजघडीला दोन्ही शहरांमध्ये पार्किंगची समस्या चांगलीच भेडसावते आहे. शहरातील वाहनतळ अपुरे पडत असल्याने नाइलाजास्तव रस्त्यावरच वाहने उभी करावी लागत आहेत. या वाहनांचा अडथळा निर्माण होऊन कोंडीला हातभार लागत आहे. कल्याणमधील महापालिकेचे दिलीप कपोते वाहनतळ हे रेल्वे स्थानक परिसरात आहे. परंतु, वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येत हे वाहनतळ आता अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाबाहेरच मुख्य मार्गाच्या कडेला नाइलाजास्तव वाहने उभी करणे भाग पडत आहे. तर, डोंबिवलीतही हीच परिस्थिती असून बहुतांश वाहनचालक हे रेल्वे स्थानकाजवळील असलेल्या केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालय परिसराचा पार्किं गसाठी सहारा घेतात. अन्यत्र, ठिकाणी सम आणि विषम तारखा ठरवून देण्यात आल्या असल्या तरी कोंडीची परिस्थिती जैसे थे आहे.
एलिव्हेटेड रिक्षातळाला मुहूर्त कधी?
डोंबिवलीत वाहतूककोंडीच्या धर्तीवर नगरसेवक मंदार हळबे यांनी स्वत: पुढाकार घेऊन रिक्षातळांबाबत उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने महापालिकेला अभ्यासपूर्ण एलिव्हेटेड रिक्षातळांचा अहवाल सादर केला होता. २०१३ मध्ये हळबे यांनी हा अहवाल दिला होता. डोंबिवली पूर्वेकडील रामनगर परिसरात हा तळ उभारण्याबाबत सूचित केले होते. राजाजी पथवर एलिव्हेटेड रिक्षातळ उभारल्यास सुमारे १०० रिक्षा उभ्या करता येणे शक्य होणार आहे. रेल्वे पुलावरून खाली न उतरता प्रवाशांना थेट एलिव्हेटेड रिक्षातळावर जाता येईल. त्यामुळे खालचा रस्ता मोकळा होऊन त्या भागातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होऊ शकेल. या एकूण प्रकल्पासाठी सुमारे ६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून आजतागायत या अहवालावर ठोस कारवाई झालेली नाही.
>फतवे, ठराव गुंडाळले बासनात
शहरातील वाहतूककोंडीवर उपाय म्हणून अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास वेळेचे बंधन घातले. सकाळी ९ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत अवजड वाहनांना शहरात येण्यास बंदी आहे. वाहतूककोंडीच्या धर्तीवर वाहतूक पोलिसांकडून काढण्यात आलेल्या फतव्याची मात्र अंमलबजावणी होताना दिसत नाही. चिरीमिरीच्या बदल्यात सर्रासपणे निर्बंध घातलेल्या वेळेत या अवजड वाहनांना प्रवेश दिला जात असून कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या चौक्यांमधील पोलीसही याला अपवाद नाहीत. पत्रीपूल परिसरात हे चित्र सर्रास दिसते.
दरम्यान, केडीएमसीकडून सुविधा पुरवल्या जात नाहीत, अशी बोंब वाहतूक विभागाकडून मारली जात असली तरी वाहतूक सुरळीत चालावी, यासाठी वाहतूक पोलिसांकडून ठोस अशी कार्यवाही होताना दिसत नाही. दुर्गाडी चौक ते पत्रीपूल या महत्त्वाच्या मार्गावर वाहने उभी करण्यास मनाई आहे. तसा ठराव केडीएमसीच्या महासभेत मंजूरही झाला आहे. परंतु, सद्य:स्थिती पाहता त्यांच्या अंमलबजावणीकडेही वाहतूक पोलिसांचे पुरते दुर्लक्ष झाले आहे.
वाहतूक पोलिसांना मदतनीस म्हणून आजघडीला ७५ वॉर्डन शहरात तैनात केले आहेत. परंतु, तुटपुंज्या मानधनात त्यांचीही कारवाई प्रभावीपणे दिसून येत नाही. केडीएमसीच्या महासभेत तर वॉर्डन हे वाहतूक पोलिसांसाठी पैसे कलेक्शन करण्याचे काम करतात, असा गंभीर आरोप करण्यात आला होता. वॉर्डन आणि एकंदरीतच वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर त्या वेळेस तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.