नवरात्र उत्सवात ‘पानविड्या’चा प्रसाद!
By Admin | Updated: October 9, 2016 21:56 IST2016-10-09T21:56:00+5:302016-10-09T21:56:00+5:30
लक्षावधी भाविकांचे शक्तिपीठ असलेल्या घाटपुरी येथील जागृत जगदंबा देवीच्या दर्शनासाठी नवरात्रात भाविकांची अलोट गर्दी असते

नवरात्र उत्सवात ‘पानविड्या’चा प्रसाद!
अनिल गवई/ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 9 - लक्षावधी भाविकांचे शक्तिपीठ असलेल्या घाटपुरी येथील जागृत जगदंबा देवीच्या दर्शनासाठी नवरात्रात भाविकांची अलोट गर्दी असते. या उत्सवानिमित्त अश्विन शु. अष्टमीला जगदंबा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पान विड्याचा (तांबूल) अनोखा प्रसाद दिल्या जातो.
तांबुलाचा नावीन्यपूर्ण प्रसाद मिळणारे घाटपुरी देवस्थान हे विदर्भातील एक महत्त्वपूर्ण देवस्थान असून, या प्रसादाच्या परंपरेला दोन दशकांचा इतिहास आहे. जागृत ज्योत म्हणून परिसरात आणि विदर्भाच्या कानाकोपऱ्यात घाटपुरी येथील जगदंबा देवीची महती आहे. या देवीच्या साक्षात्काराची प्रचिती आल्याने, घाटपुरी येथील जगदंबा मंदिरात नवरात्रोत्सवाच्या काळात नि:शुल्क तांबूल वितरणाची परंपरा खामगाव येथील अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी १९९८ पासून सुरू केली. सुरुवातीला अतिशय अल्प स्वरूप या प्रसाद वितरणाचे होते; मात्र दिवसेंदिवस या प्रसादाची ख्याती दूरवर पोहोचत असल्याने, आता सुमारे २७ हजार पानांपासून (खाण्याची पाने) प्रसाद तयार केल्या जातो.
अश्विन शु. अष्टमीला रात्री ८ ते ११ च्या कालावधीत दूरवरून तसेच दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला हा प्रसाद दिल्या जातो. या प्रसादाच्या प्रसादाच्या वितरणासाठी अग्रवाल परिवाराकडून कोणतीही वर्गणी घेतली जात नाही, तथापि, आपल्या शक्तीनुरूप दान देणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेला तडा न देता, तो देईल तितक्याच रुपयांच्या साहित्याची प्रसादात अतिरिक्त वाढ करण्यात येते. तांबुलाचा प्रसाद वितरणासाठी पंकज अग्रवाल, पराग अग्रवाल, वरुण अग्रवाल, अंकित अग्रवाल, संजय केडिया आणि अग्रवाल परिवारातील सदस्य सहकार्य करतात. उपवासालाही चालतो पानविडा! जगदंबा देवीच्या मंदिरात वितरित केल्या जाणाऱ्या पानविड्याच्या प्रसादात खाण्याचे पान, सोप, सुपारी, लवंग, विलायची, चमन बहार, चटणी, गुलकंद आदी साहित्याचा वापर केल्या जातो. त्यामुळे हा प्रसाद उपवासालादेखील चालतो.
तसेच अष्टमीला उपवास सोडणारे भाविक या तांबुलाच्या प्रसादानेच उपवास सोडण्याची प्रथा आता येथे प्रचलित झाली आहे. आठ दिवसांपूर्वीच या प्रसादाची तयारी केल्या जाते.
अष्टमीला पान विड्याच्या प्रसादाचे वाटप करण्याच्या परंपरेला १८ वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला या प्रसाद वितरणाचे अतिशय लहान स्वरूप होते. आता २७ हजार पाने आणि इतर साहित्याचा प्रसाद वितरित केल्या जातो. या प्रसादासाठी अनोखी श्रद्धा भाविकांमध्ये दिसून येते.
- पंकज अग्रवाल सेवादायक,
तांबूल प्रसाद