रत्नागिरीतील पानवल धरण तुडुंब
By Admin | Updated: July 19, 2016 20:03 IST2016-07-19T20:03:10+5:302016-07-19T20:03:10+5:30
विजेसाठी एकही रुपया खर्च न करता रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे पानवल धरण काठोकाठ भरून वाहू लागले आहे.

रत्नागिरीतील पानवल धरण तुडुंब
ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. 19 - विजेसाठी एकही रुपया खर्च न करता रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे पानवल धरण काठोकाठ भरून वाहू लागले आहे.
रत्नागिरी शहरापासून सुमारे १६ कि.मी. अंतरावर असलेले पानवल धरण १९५२ साली मंजूर झाले. १९६० साली या धरणाच्या कामाला सुरुवात झाली आणि१९६५ साली ते पूर्ण झाले. तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्याचे उदघाटन केले.
या धरणातील पाणी नैसर्गिक उताराच्या आधाराने नाचणे येथे येते. तेथील शुद्धीकरण प्रकल्पातून हे पाणी शहरवासीयांपर्यंत पोहोचते. एकीकडे रत्नागिरीतील शीळ धरणाच्या पाण्यासाठी वीज बिलावर दरमहा २० लाख रुपये खर्च होत असताना पानवल धरण मात्र अनेक वर्षे वीज बिलाशिवाय पाणीपुरवठा करत आहे.
या धरणातून रोज दीड ते दोन लाख लीटर्स इतका पाणीपुरवठा शहराला होतो. त्याने शहराची पूर्ण गरज भागत नसली तरी विनाखर्चाचे पाणी म्हणून ते खूप उपयोगी आहे.
या धरणाला डागडुजीची गरज आहे. त्याची भिंत मजबूत करून गाळ उपासला गेला तर पुढील आणखी पन्नास वर्षे हे धरण रत्नागिरीला विनाखर्च पाणीपुरवठा करत राहील.