पानसरेंचा मारेकरी मिरजेचा !
By Admin | Updated: March 23, 2015 00:52 IST2015-03-23T00:50:30+5:302015-03-23T00:52:04+5:30
दाम्पत्याचा गौप्यस्फोट : २५ लाखांची सुपारी घेऊन सराईत पारधी गुन्हेगाराने केली हत्या

पानसरेंचा मारेकरी मिरजेचा !
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी मिरज येथील एका सराईत फासेफारधी गुन्हेगाराने २५ लाखांची सुपारी घेतली आहे. पानसरे दाम्पत्यावर हल्ला करून तो कर्नाटकात लपल्याची धक्कादायक माहिती मिरज येथील एका दाम्पत्याने पोलिसांना रविवारी दिली. त्यानुसार या दाम्पत्याकडे पोलीस मुख्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल हे दिवसभर माहिती घेत होते, असे विश्वसनीय पोलीस सूत्रांनी सांगितले. पानसरे यांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस शर्थीने प्रयत्न करीत आहेत. पोलिसांची ३५ विशेष पथके विविध स्तरांवर काम करीत आहेत. त्यामध्ये ३५ अधिकारी व ४०० पोलिसांचा समावेश आहे. सर्व स्तरांवर तपास करीत आहेत. गुन्हेगार टोळ्या, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कसून चौकशी करीत असताना मिरजेतील एका फासेपारधी दाम्पत्याला पानसरे यांच्या मारेकऱ्यांची माहिती असल्याचे पोलिसांना खबऱ्याकडून समजले. पोलिसांनी तातडीने या दाम्पत्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती पुढे आली. पानसरे यांच्या हत्येची सुपारी मिरज येथील एका सराईत फासेपारधी गुन्हेगाराने घेतली आहे. त्यासाठी त्याने २५ लाख रुपयांची सुपारी घेतली आहे, असे या दाम्पत्याने पोलिसांना सांगितले. या माहितीने पोलीस चक्रावले. मिरज पोलिसांचे एक पथक त्या दाम्पत्याला घेऊन रविवारी सकाळी कोल्हापुरात आले. पोलीस मुख्यालयामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी त्यांच्याकडून माहिती घेतली. मारेकरी हा कर्नाटकात लपला असून तो आम्हाला २५ हजार रुपये देणार होता, अशी माहितीही त्यांनी पोलिसांना दिली. मारेकरी दाम्पत्याला २५ हजार रुपये कशासाठी देणार होता, याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. फासेपारधी दाम्पत्याने दिलेली माहिती आणि पोलिसांना आतापर्यंत मिळालेल्या तपासांतील साम्य मिळते-जुळते असल्याने पोलीस युद्धपातळीवर मारेकऱ्यांचा शोध घेऊ लागले आहेत. रात्रीच काही विशेष पथके कर्नाटकात रवाना झाली आहेत. त्या दाम्पत्याला विशेष पोलीस बंदोबस्तात रात्री उशिरा मिरजेला नेण्यात आले, असेही या सूत्रांनी सांगितले.(प्रतिनिधी)
पोलीस पथके कर्नाटकात रवाना
फासेपारधी दाम्पत्याने दिलेली माहिती आणि आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासांतील साम्य जुळत असल्याने पोलिसांची काही विशेष पथके रात्रीच कर्नाटकात रवाना झाली असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
आंबोली येथे संशयास्पद सापडलेल्या मोटारसायकलीचा वापर हा पानसरे यांच्या हत्येतील मारेकऱ्यांनी केला असल्याबाबत अद्याप कोणताच पुरावा मिळत नाही. त्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे, अशी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली.