पानसरे हत्येचे धागेदोरे मिळेना; पोलीस हतबल
By Admin | Updated: March 17, 2015 01:18 IST2015-03-17T01:18:04+5:302015-03-17T01:18:04+5:30
ज्येष्ठ कामगार नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याला सोमवारी एक महिना पूर्ण झाला, तरीही या घटनेचे गूढ उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

पानसरे हत्येचे धागेदोरे मिळेना; पोलीस हतबल
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याला सोमवारी एक महिना पूर्ण झाला, तरीही या घटनेचे गूढ उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. संपूर्ण पोलीस यंत्रणा तपासकामास लागलेली असतानाही मारेकरी मोकाट फिरत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
पानसरे दाम्पत्य १६ फेब्रुवारीला सकाळी फिरायला गेल्यानंतर त्यांच्यावर राहत्या घरापासून काही अंतरावरच हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते. अॅड. गोविंद पानसरे यांच्यावर उपचार सुरू असताना २० फेब्रुवारीला मुंबई येथे त्यांचे निधन झाले. या हल्ल्यासंदर्भात पोलिसांना कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. प्रत्यक्ष साक्षीदार उमा पानसरे यांच्याकडून तपास अधिकारी अंकित गोयल यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याकडूनही यासंदर्भात पूर्णत: माहिती प्राप्त झालेली नाही.
पानसरे हत्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त फोन कॉल्सची चौकशी केली. सराईत गुन्हेगार, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील व्यक्ती, नातेवाईक आदींसह सुमारे ६०० लोकांचे
जबाब घेतले. चार संशयास्पद दुचाकी जप्त केल्या; परंतु पोलिसांच्या हाती अद्याप ठोस असे काहीही लागलेले नाही. (प्रतिनिधी)