पंकजा, तावडे राजीनामा द्या!

By Admin | Updated: July 1, 2015 02:15 IST2015-07-01T02:15:05+5:302015-07-01T02:15:05+5:30

महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर शासकीय खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप झाला असल्याने या दोघांनी

Pankaja, Tawde resign! | पंकजा, तावडे राजीनामा द्या!

पंकजा, तावडे राजीनामा द्या!

मुंबई : महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर शासकीय खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप झाला असल्याने या दोघांनी मंत्रीपदाचे राजीनामे देऊन चौकशीला सामोरे जावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. मागील युती सरकारमध्ये शिवसेना मंत्र्यांवर आरोप होताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामे द्यायला लावले होते. त्याचेच अनुकरण भाजपा मंत्र्यांनी करावे, असे आवाहन सावंत यांनी केले. त्याला तीव्र आक्षेप घेताना, असेच आरोप शिवसेनेच्या मंत्र्यांवर होतील तेव्हा सावंत याची भूमिका काय असेल, असा सवाल भाजपाने केला आहे.
मुंडे यांच्यावर चिक्की व अन्य खरेदीत घोटाळा केल्याचे आरोप झाले आहेत तर तावडे यांची शिक्षण विभागातील वादग्रस्त खरेदी वित्त विभागाने रोखली. त्यांच्या पदवीचा वाद ताजा आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सावंत यांनी म्हटले आहे की, भाजपाच्या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरे जावे. मुंडे व तावडे यांच्यावर कंत्राटे देताना घोटाळे केल्याचे गंभीर आरोप झालेले आहेत. मंत्र्यांनी राजीनामे देण्यास नकार देणे याचा अर्थ ते चौकशीला घाबरतात काय, असा सवालही सावंत यांनी केला.
आमदार अतुल भातखळकर यांनी सावंत यांच्या मागणीला तीव्र आक्षेप घेतला आहे. मुंडे व तावडे यांच्यावरील आरोप खोटे व राजकीय हेतूने प्रेरीत आहेत. शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्याचा अधिकार केवळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना असल्याने ते जोपर्यंत हीच भूमिका घेत नाहीत तोपर्यंत ही सेनेची भूमिका म्हणता येणार नाही. युतीच्या मागील सरकारच्या काळात आयोगामार्फत झालेल्या चौकशीत सेनेचे सुतार दोषी ठरले तर भाजपाचे शिवणकर निर्दोष असल्याचे सिद्ध झाले, याकडे भातखळकर यांनी लक्ष वेधले. त्यानंतरही अनेक मंत्र्यांवर राजकीय हेतूने प्रेरीत आरोप झाले. तेव्हा मात्र शिवसेनाप्रमुखांनी राजीनाम्याची भूमिका घेतली नाही, असे टोले भातखळकर यांनी लगावले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Pankaja, Tawde resign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.