पंकजा याच राजकीय वारसदार

By Admin | Updated: June 17, 2014 03:47 IST2014-06-17T03:47:15+5:302014-06-17T03:47:15+5:30

पंकजा यांच्या साक्षीने भगवानगडाचे महंत ह.भ.प. नामदेव शास्त्री यांनी पंकजा ह्याच गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार आहेत, हे स्पष्ट केले

Pankaja is the same political heir | पंकजा याच राजकीय वारसदार

पंकजा याच राजकीय वारसदार

बीड/परळी : गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या आमदार पंकजा पालवे आणि त्यांचे पुतणे आमदार धनंजय मुंडे हे दोघे एकत्र येणार की नाही, या चर्चेला आज परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या गोडजेवणाच्या कार्यक्रमात पूर्णविराम मिळाला. पंकजा यांच्या साक्षीने भगवानगडाचे महंत ह.भ.प. नामदेव शास्त्री यांनी पंकजा ह्याच गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार आहेत, हे स्पष्ट केले. त्यांनी पंकजा आणि धनंजय एकत्र होण्याचा प्रश्नच नाही, असेही सांगून टाकले.
मुंडे यांच्या हयातीतच कुटुंबाचे विभाजन झाले होते, आता त्यांच्यानंतर त्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही, असेही ते म्हणाले. त्यामुळे या दोघांच्या एकत्रीकरणासंदर्भातील चर्चा हवेतच विरली आहे. मुंडे यांच्या निधनानंतर भाजपात निर्माण झालेली पोकळी कोण भरून काढणार, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. आपसूकच त्यांच्या कन्या पंकजा यांच्या नावाभोवती चर्चेला पूर्णविराम मिळत होता. परंतु पंकजा नेतृत्व स्वीकारणार की नाही, अशी साशंकताही व्यक्त केली जात होती. याच दरम्यान बीड जिल्ह्यातील काही जणांनी पंकजा आणि धनंजय या दोघांनी मिळून नेतृत्व स्वीकारावे, अशी मागणी केली होती.
मात्र यासंदर्भात आमदार धनंजय आणि आमदार पंकजा यांच्याकडून काहीही सांगण्यात येत नव्हते. आजच्या या कार्यक्रमाने बीड जिल्ह्याच्या राजकारणाची पुढील दिशाही स्पष्ट केली आहे. पालवे आणि मुंडे असे दोन गट राजकारणात सक्रिय राहण्याचेच संकेत मिळाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Pankaja is the same political heir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.