मुंबई - वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या जाग ी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सावकारे यांची नियुक्ती बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून करण्यात आली.
सावकारे हे भुसावळचे आमदार आहेत. दरवेळी भंडारा येथे जाणे शक्य नाही, तेव्हा पालकमंत्री पदातून मुक्त करा, अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे केलेली होती, अशी माहिती सावकारे यांनी पत्रकारांना दिली. बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्रिपद दिले त्याचे समाधान आहे. आमच्या जळगावच्या शेजारचा जिल्हा असल्याने तिथे सातत्याने जाता येईल, असेही सावकारे यावेळी म्हणाले.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे बुलढाणाचे पालकमंत्री आहेत. ते सातारा जिल्ह्यातील असल्याने बुलढाण्याला सातत्याने येण्यात त्यांनाही अडचणी येतात. ते अजित पवार गटाचे आहेत. बुलढाणा जिल्ह्याला भाजपचेच पालकमंत्री असले पाहिजेत, अशी स्थानिक भाजप नेत्यांची मागणी होती. ती पूर्ण केली नसली तरी मुख्यमंत्र्यांनी आता सावकारे यांच्या रूपाने सहपालकमंत्री देऊन भाजपजनांचे समाधान केले आहे.
स्थानिक गटबाजी दूर करण्याचा उद्देश?भंडारा येथील शिंदेसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी डॉ. पंकज भोयर यांना तेथे पालकमंत्री म्हणून पाठविले अशी चर्चा आहे. भाजपमधील स्थानिक गटबाजी दूर करण्याचाही उद्देश भोयर यांच्या नियुक्तीमागे असल्याचे म्हटले जाते. नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय मात्र अद्याप होऊ शकलेला नाही.
दोन जिल्हे कोणाकडे ?उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मुंबई शहर, ठाणे), उपमुख्यमंत्री अजित पवार (पुणे, बीड), महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (नागपूर, अमरावती) यांच्यानंतर दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असलेले भोयर हे चौथेच मंत्री आहेत.
आधी मुश्रीफांचा राजीनामावैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी चालू वर्षी मार्चमध्ये वाशिमच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. कार्यबाहुल्यामुळे वाशिमचे पालकमंत्रिपद आपल्याला सांभाळणे शक्य नाही, असे त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना कळविले होते. त्यानंतर मंत्री दत्ता भरणे यांना हे पालकमंत्रिपद देण्यात आले.