पॅनिक बटनची मध्य रेल्वेला डोकेदुखी
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:06+5:302016-06-07T07:43:06+5:30
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलमधील महिला डब्यात प्रायोगिक तत्त्वावर मध्य रेल्वेकडून नुकतेच पॅनिक बटन बसविण्यात आले

पॅनिक बटनची मध्य रेल्वेला डोकेदुखी
मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलमधील महिला डब्यात प्रायोगिक तत्त्वावर मध्य रेल्वेकडून नुकतेच पॅनिक बटन बसविण्यात आले. मात्र या बटनाचा गैरवापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन घटनांमध्ये विनाकारण पॅनिक बटण वापरण्यात आल्याने लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागला आहे. या घटनांचा अहवाल मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना देण्यात येणार आहे.
एका लोकलच्या सर्व महिला डब्यात दोन आसनांच्या मधे लाल रंगाचे पॅनिक बटण बसविण्यात आले आहे. आपातकालिन परिस्थीतीत महिला प्रवाशाने या बटनचा वापर केल्यास धोक्याची सूचना देणारा दिवा आवाजासहित सुरु होईल. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील रेल्वे कर्मचाऱ्यासह सुरक्षा यंत्रणांना याबाबतची सूचना मिळेल. शिवाय त्याचा आवाज मोटरमन आणि गार्डलाही ऐकू येणार असल्याने आपातकालिन परिस्थीतीची माहीती मिळेल, अशी माहीती मध्य रेल्वेकडून देण्यात आली होती आणि ही लोकल मे च्या शेवटच्या आठवड्यात हार्बरवर चालविण्यात आली. मात्र गेल्या आठवड्यात दोन दिवस वाशी आणि मानखुर्द स्टेशन येताच महिलांच्या डब्यातून विनाकारण पॅनिक बटण वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. या बटणाचा वापर झाल्यामुळे दोन्ही दिवस ही लोकल स्थानकात १५ मिनिटे एकाच ठिकाणी उभी होती. या घटनेची चौकशी करतानाच त्याचा अहवाल तयार केला जाणार आहे.