पन्हाळगड किल्ला झालाय ८२५ वर्षांचा
By Admin | Updated: October 7, 2014 23:50 IST2014-10-07T21:56:22+5:302014-10-07T23:50:46+5:30
किल्ल्याची बांधणी राजा भोजच्या काळात. सुमारे ८२५ वर्षे पूर्ण होऊन ८२६ वे वर्ष सुरू झाले

पन्हाळगड किल्ला झालाय ८२५ वर्षांचा
किरण मस्कर - कोतोली -छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक तेजस्वी कामगिरींचा साक्षीदार व मराठ्यांच्या इतिहासात आपले स्वतंत्र स्थान असलेला बुलंद किल्ला म्हणजेच पन्हाळगड होय. पन्हाळगडाच्या बांधणीस सुमारे ८२५ वर्षे पूर्ण झाली असून, ८२६व्या वर्षात या किल्ल्याने पदार्पण केले आहे. किल्ल्यावरील पुरातन वास्तुसुद्धा व्यवस्थितरीत्या आजही पाहावयास मिळताहेत. एवढ्या वर्षांनंतर किल्ल्याची किरकोळ पडझड वगळली, तर इतिहास अभ्यासकांनाही किल्ल्याची भक्कम बांधणी आजही आश्चर्याचा धक्का देणारी आहे. पन्हाळगडाची बांधणी कोणी केली? हे सांगणे फारच कठीण; पण कधी बांधला याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत व पाहावयासही मिळतात. ज्येष्ठ इतिहास संशोधक रावबहादूर, डी. बी. पारसनीस यांनी १९२३ साली लिहिलेले ‘पन्हाळा’ हे इंग्रजीमधील पुस्तक हा त्याचा सबळ पुरावा होय. याच पुस्तकांच्या आधारावरून अनेकांनी पन्हाळ्याची वर्णने वेगवेळ्या स्वरूपात मांडली आहेत. पन्हाळा किल्ल्याचे बांधकाम इसवी सन ११५० ते १२०९ या कालावधीत झाल्याच्या व तत्कालीन राज्य शिलाहारवंशीय राजांचे होते, अशा अनेक नोंदी ताम्रपत्रावर कोल्हापूर, सातारा, मिरज येथे सापडल्या आहेत, असे अनेक पुस्तकांत नमूद आहे. शिलाहारवंशीय राजाच्या अखत्यारित सातारा जिल्हा, बेळगावचा काही भाग व कोल्हापूर प्रांत होता. त्यांच्या वंशाचा पहिला राजा हा भोज होता. पन्हाळा किल्ल्याची बांधणी राजा भोजच्या काळात झाली आहे. या बांधणीला सुमारे ८२५ वर्षे पूर्ण होऊन ८२६ वे वर्ष सुरू झाले आहे. राजा भोजपूर्वी राष्ट्रकूट कदंब चालक्य या राजघराण्यांनी इ.स.५०० ते १०५० या कालावधीत कोल्हापूर प्रदेशावर कब्जा केला; पण पन्हाळ्याच्या टेकडीवर मात्र फक्त शिलाहारवंशी यांनीच राज्य केल्याचेही ठिकठिकाणी सापडलेल्या शिलालेखांमध्ये, ताम्रपत्रांमध्ये नमूद आहे. आजमितीस पन्हाळगडाला ८२५ वर्षे पूर्ण झाली आहेत.