जिल्हा उपनिबंधकपदी पांडुरंग खोडका
By Admin | Updated: June 7, 2016 07:42 IST2016-06-07T07:42:01+5:302016-06-07T07:42:01+5:30
रायगड जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपनिबंधकपदी पांडुरंग खोडका यांनी सोमवारी पदभार स्वीकारला.

जिल्हा उपनिबंधकपदी पांडुरंग खोडका
अलिबाग : रायगड जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपनिबंधकपदी पांडुरंग खोडका यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. तत्कालीन उपनिबंधक छगन गंडाळ यांची बदली औरंगाबाद येथे झाली आहे. अलिबाग तालुका अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी यांनी पांडुरंग खोडका यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रायगड जिल्ह्यामध्ये झीरो पेंडन्सी पॅटर्न राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पेण अर्बन बँकेच्याबाबतीत सुरु असलेल्या प्रकरणाचा लवकरच निपटारा करुन खातेदार, ठेवीदार यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खोडका यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सर्व कारभार आॅनलाइन करण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. खोडका हे अलिबाग येथील कार्यालयात रुजू होण्याआधी पुणे येथील सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयात उपनिबंधक म्हणून कार्यरत होते. १९९१ मध्ये त्यांनी मुंबई येथे सहाय्यक निबंधक म्हणून सरकारी सेवेला सुरुवात केली.
गृहनिर्माण संस्थांना झाडे लावणे बंधनकारक
रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे चार हजार गृहनिर्माण संस्था आहेत. सर्व गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या इमारतीच्या परिसरात किमान १० वृक्ष लावून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. या उपक्रमाला खोडका यांनी तातडीने मंजुरी दिली. त्यामुळे आता गृहनिर्माण संस्थांना आपापल्या इमारतीच्या परिसरात वृक्ष लागवड करावी लागणार आहे.
वर्धा, रत्नागिरी, मुरबाड, ठाणे अशा अनेक ठिकाणी खोडका यांनी विविध पदांवर काम केले आहे. त्यांच्या २५ वर्षांच्या सेवेचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. यावेळी लेखापरीक्षक संदीप गोठीवरेकर उपस्थित होते.