पंडितराव (अण्णा) मुंडे यांचे निधन

By Admin | Updated: October 13, 2016 21:18 IST2016-10-13T20:25:12+5:302016-10-13T21:18:18+5:30

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे बंधू आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे यांचं दीर्घ आजारानं निधन झालं

Panditrao (Anna) Munde passed away | पंडितराव (अण्णा) मुंडे यांचे निधन

पंडितराव (अण्णा) मुंडे यांचे निधन

ऑनलाइन लोकमत

परळी, दि. 13 - भाजपचे दिवंगत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडील पंडितराव  ( अण्णा) पांडुरंग मुंडे (७५) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने गुरुवारी सायंकाळी सात वाजता निधन झाले. ग्रामीण बाज असलेले राहणीमान, रांगडी भाषाशैली व करारी बाणा ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये. नाथ्रा गावचे सरपंच ते जिल्हा परिषद अध्यक्ष ही त्यांची राजकीय कारकीर्द कायम स्मरणात राहील.
 
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती पंडितराव (अण्णा) मुुंडे यांना गेल्या काही वर्षांपासून प्रकृती साथ देत नव्हती. त्यामुळे ते राजकीय कार्यक्रमांत फारसे सहभागी होत नसत. स्व. गोपीनाथराव मुंडे यांना ज्येष्ठ बंधू म्हणून त्यांनी खंबीर साथ दिली होती. मात्र, धनंजय मुंडे यांना डावलून गोपीनाथराव मुंडे यांनी कन्या पंकजा यांना विधानसभेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. २०१२ मध्ये पंडितराव मुंडे व धनंजय मुंडे यांनी बंडाचे निशाण फडकावत अजित पवार, दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला होता.
 
गुरुवारी सायंकाळी त्यांना अचानक छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना नातेवाईकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील डॉ. सचिन गुट्टे यांच्या दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची वार्ता जिल्ह्यात वा-यासारखी पसरली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे तातडीने मुंबाईहून परळीला रवाना झाले. कार्यकर्त्यांचीही परळीत मोठी गर्दी झाली आहे. पंडितराव मुंडे यांच्या पश्चात पत्नी रुक्मिणी, मुलगा धनंजय, तीन मुली, सून, नातू, भावजयी असा परिवार आहे. 
 
उद्या अंत्यसंस्कार...
 
पंडितराव (अण्णा) मुंडे यांचे पार्थिव शुक्रवारी दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी दुपारी चार वाजता वैद्यनाथ मंदिराजवळील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Web Title: Panditrao (Anna) Munde passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.