सांडपाण्याने पंचगंगेची गटारगंगा
By Admin | Updated: June 4, 2015 04:13 IST2015-06-04T04:13:38+5:302015-06-04T04:13:38+5:30
कोल्हापूर व इचलकरंजीमधील नागरी वसाहतीतील मैला व सांडपाणी हेच पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचे सर्वांत महत्त्वाचे व मुख्य कारण आहे.

सांडपाण्याने पंचगंगेची गटारगंगा
विश्वास पाटील, कोल्हापूर
कोल्हापूर व इचलकरंजीमधील नागरी वसाहतीतील मैला व सांडपाणी हेच पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचे सर्वांत महत्त्वाचे व मुख्य कारण आहे. नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्यापैकी तब्बल ८७.५७ टक्के पाणी कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका व परिसरातील गावांमधून येते. तर उद्योगांपासून निर्माण होणाऱ्या प्रदूषित पाण्याचे प्रमाण १२.४३ टक्के इतके आहे. प्रदूषणास जबाबदार घटकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
प्रदूषण रोखण्याची कायद्याने सर्वाधिक महत्त्वाची जबाबदारी असणाऱ्या घटकांनीच नदीची गटारगंगा केली आहे. ‘पर्यावरण दिना’च्या (५ जून) पार्श्वभूमीवर पंचगंगेच्या सद्य:स्थितीचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गतवर्षी पंचगंगा नदी प्रदूषणाचा अत्यंत तपशीलवार कृती आराखडा केला. त्यामध्ये तीन स्थानिक स्वराज्य संस्थांनाच प्रदूषणासाठी जबाबदार धरण्यात आले.
उच्च न्यायालयातील याचिकेमध्येही हाच मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. न्यायालयाने प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी ‘नॅशनल एनव्हार्यमेंटल इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट’ची (निरी) समिती नियुक्त केली. समितीने केलेल्या शिफारशी व उच्च न्यायालयाच्या रेट्यामुळे प्रदूषण रोखण्याची कार्यवाही काही प्रमाणात सुरू झाली, परंतु त्यास अपेक्षित वेग नाही.
कोल्हापूर व इचलकरंजी वगळता इतर भागांत मैला व सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा नाही. कोल्हापूरमध्ये फक्त एकतृतीयांश भागातच मैलावाहिन्या आहेत. येथे ४३.५ दशलक्ष लिटर पाण्यावरच प्राथमिक प्रक्रिया होते. उर्वरित पाणी गेल्या २५ वर्षांपासून प्रक्रियेशिवायच नदीत मिसळत आहे. इचलकरंजीने २० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेची यंत्रणा उभारली. मात्र, त्यातही १२ दशलक्ष लिटर सांडपाण्यावरच प्रक्रिया होते. उर्वरित प्रदूषित पाणी नदीत मिसळते.