पणजी - आषाढने केली निराशा, जुलैमध्ये आतापर्यंत केवळ १३ इंच पाऊस
By Admin | Updated: July 16, 2016 18:56 IST2016-07-16T18:56:07+5:302016-07-16T18:56:07+5:30
पणजीत या महिन्यात केवळ १३ इंचच पाऊस पडला आहे तर मागील दोन आठवड्यात केवळ ६ इंच पावसाची नोंद झाली आहे

पणजी - आषाढने केली निराशा, जुलैमध्ये आतापर्यंत केवळ १३ इंच पाऊस
>ऑनलाइन लोकमत -
पणजी, दि. 16 - कृषी उत्पादन आणि पाण्याच्या साठ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या गणल्या गेलेल्या आषाढ महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, परंत प्रत्यक्षात आषाढने जवळ जवळ फसविल्यातच जमा आहे. आतापर्यंत या महिन्यात केवळ १३ इंचच पाऊस पडला आहे तर मागील दोन आठवड्यात केवळ ६ इंच पावसाची नोंद झाली आहे.
जून महिन्यात जोरदार पडलेल्या पावसामुळे गोमंतकियांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. जुलै महिन्यात साधारण जरी पाऊस पडला तरी एकूण सरासरी पाऊस ८० इंचाच्या घरात पोहोचणार असे चित्र होते. प्रत्यक्षात मात्र निराशाच पदरी पडली आहे. जून महिन्यात ज्या ठिकाणी सरासरी पावसाने इंचाचे अर्धशतक गठले होते तेथे जुलै महिन्याचा पंधरवडा उलटला तरी केवळ १३ इंचच पाऊस नोंद झाला आहे. त्यामुळे एकूण सरासरी पाऊस ६३ इंचापेक्षा वर जाऊ शकला नाही.
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच कोसळलेला जोरदार पाऊस पुन्हा कधी पाहायला मिळालाच नाही. तीन दिवसातून एक इंच पाऊस इतके प्रमाण घटले आहे. ६ जुलै ते १६ जुलै पर्यंत केवळ ६ इंच पावसाची नोंद झाली आहे. मगील दोन दिवसांपासून तर जवळ जवळ पाऊस शून्यच आहे. मान्सून प्रक्रिया कमजोर झाल्याची माहिती हवामान खात्याच्या पणजी केंद्राच्या संचालक व्ही के मिनी यांनी दिली आहे. वातावरणात लवकर सुधारणा न झाल्यास या महिन्यांचे ऊर्वरीत दिवसही कोरडे जाण्याची शक्यता आहे.