ग्रामप्रदक्षिणा करून पालखी मार्गस्थ
By Admin | Updated: July 4, 2016 01:49 IST2016-07-04T01:49:44+5:302016-07-04T01:49:44+5:30
श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळा यवत येथील मुक्काम आटोपून सकाळी आठच्या सुमारास मार्गस्थ झाला.

ग्रामप्रदक्षिणा करून पालखी मार्गस्थ
यवत : विठुनामाचा गजर करीत पंढरीच्या वाटेवर चाललेला श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळा यवत येथील मुक्काम आटोपून सकाळी आठच्या सुमारास मार्गस्थ झाला. तत्पूर्वी यवत गावात पालखीची ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करून जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आरती करण्यात आली.
रिमझिम पावसाच्या सरींमध्ये यवतमध्ये शनिवारी (दि. २) पालखी सोहळा यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात मुक्कामी होता. पालखी सोहळा मुक्कामी असताना मागील एक महिन्यापासूनओढ दिलेल्या वरुणराजाने परिसरात रात्रभर जोरदार हजेरी लावली. रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग चांगलाच सुखावला. मात्र मुक्कामी असलेल्या वारकरीवर्गाची पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, यवत पंचक्रोशीतील गावांमधून पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी येऊन रांगा लावून दर्शन घेतले.
भांडगाव येथे पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. भांडगावच्या सरपंच कमल टेळे, उपसरपंच रवींद्र दोरगे, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मधुकर दोरगे, माजी उपसरपंच लक्ष्मण काटकर, लक्ष्मण दोरगे, बाळासाहेब दोरगे, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष नितीन दोरगे, संग्राम ढोणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
।पावसात केल्या वारकऱ्यांनी अंघोळी...
यवत मुक्कामी संत तुकाराममहाराज पालखी सोहळा असताना पहाटे ३ वाजता सुरू झालेला मुसळधार पाऊस सकाळपर्यंत सुरू होता. यामुळे रात्रीची झोपमोड झाली असली तरी दुष्काळामुळे त्रासलेल्या वारकरीवर्गाने पावसाच्या पाण्यात अंघोळ करण्याचा अनोखा आनंद घेतला, तर पालखीच्या आगमनाबरोबर पावसाचेदेखील जोरदार आगमन झाल्याने परिसरातील शेतकरीवर्गाला चांगलाच दिलासा मिळाला.