‘पालखीचे भोई’ हरपले!

By Admin | Updated: September 24, 2014 05:09 IST2014-09-24T05:09:37+5:302014-09-24T05:09:37+5:30

सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

'Palkhi Bhoi' Harapale! | ‘पालखीचे भोई’ हरपले!

‘पालखीचे भोई’ हरपले!

काव्यक्षेत्रातील ‘सर’ शंकर वैद्य यांचे निधन


मुंबई : ‘शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला’, ‘दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला’ अशा अनेक अजरामर काव्यपंक्तींनी गेली अनेक दशके काव्य रसिकांच्या मनावर राज्य करणारे आणि काव्यक्षेत्रात ‘सर’ म्हणून ओळखले जाणारे कविवर्य शंकर वैद्य यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा निरंजन, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी दीडच्या सुमारास त्यांचे पार्थिव दादर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. तिथे रामदास भटकळ, अचला जोशी, अरुण म्हात्रे, विसुभाऊ बापट, उषा तांबे आदी मान्यवरांसह अनेक साहित्यप्रेमींनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले.
वैद्य यांचा जन्म १५ जू्न १९२८ रोजी पुण्यातील ओतूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जुन्नरमध्ये झाले. तिथे कवी वा. ज्यो. देशपांडे यांच्या सान्निध्यात त्यांची कविता फुलत गेली. त्यांच्याच ‘स्वस्तिका’ या काव्यसंग्रहाचे संपादनही त्यांनी केले. ‘पालखीचे भोई... आम्ही पालखीचे भोई’ ही त्यांची कविता प्रसिद्ध होती. भावनाशील कवी म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. त्यांचे ‘कालस्वर’, ‘दर्शन’, ‘सांजगुच्छ’, ‘मैफल’, ‘पक्षांच्या आठवणी’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी कुसुमाग्रजांच्या ‘रथयात्रा’ व ‘प्रवासी पक्षी’ या पुस्तकांचे हिंदी रूपांतर केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Palkhi Bhoi' Harapale!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.