पालघर नवा जिल्हा
By Admin | Updated: August 1, 2014 05:07 IST2014-08-01T05:07:20+5:302014-08-01T05:07:20+5:30
सागरी-डोंगरी अन् नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून उद्यापासून नव्याने पालघर हा राज्यातील ३६वा जिल्हा अस्तित्वात येत आहे़

पालघर नवा जिल्हा
ठाणे : सागरी-डोंगरी अन् नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून उद्यापासून नव्याने पालघर हा राज्यातील ३६वा जिल्हा अस्तित्वात येत आहे़ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अन् उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शानदार समारंभात नवीन जिल्ह्याच्या कामकाजास उद्यापासून सुरुवात होणार आहे़
सध्याच्या ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या १.१० कोटी आहे़ मात्र, विभाजनानंतर अस्तित्वात येणाऱ्या नव्या पालघरची एकूण लोकसंख्या १४,३५,१७८ एवढी असून, ठाण्याची लोकसंख्या ९६ लाख १८ हजार ९५३ इतकी राहणार आहे़ तर ठाणे शहराची लोकसंख्या १८ लाखांवर आहे़ नव्या पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आणि तलासरी हे तीन तालुके १०० टक्के आदिवासी आहेत, तर वसई, विक्रमगड आणि वाडा तालुक्यांत संमिश्र लोकसंख्या आहे़ गडचिरोली, नंदुरबारप्रमाणे पालघर जिल्ह्याला आदिवासी जिल्ह्याचे स्वतंत्र अस्तित्व मिळणार असल्याने त्यासाठी केंद्राकडून मिळणाऱ्या कोट्यवधींच्या अनुदानामुळे पालघर परिसराचा झपाट्याने विकास होण्यास मदत होणार आहे़ (खास प्रतिनिधी)