पाकसाठी देश गहाण ठेवणा-यांना काळ्या तोंडानेच फिरावे लागेल - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: October 13, 2015 09:22 IST2015-10-13T09:22:24+5:302015-10-13T09:22:37+5:30
यापुढे पाकड्यांसाठी देश गहाण ठेवणा-यांना काळ्या तोंडानेच फिरावे लागणार असा इशाराच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

पाकसाठी देश गहाण ठेवणा-यांना काळ्या तोंडानेच फिरावे लागेल - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - खुर्शीद कसुरी हे शांतिदूत किंवा महात्मा आहेत आणि त्यांना विरोध करुन शिवसेनेने मोठा अपराध केला अशी आपटाआपटी सुरु असली तरी यापुढे पाकड्यांसाठी देश गहाण ठेवणा-यांना काळ्या तोंडानेच फिरावे लागणार असा इशाराच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध होता. या कार्यक्रमाचे आयोजक व माजी भाजपा नेते सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शिवसैनिकांनी शाई फेकली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी या घटनेवर भाष्य केले आहे. सुधींद्र कुलकर्णी अत्यानंदाने व अभिमानाने काळेतोंड घेऊन फिरत होते पण हा प्रकार निर्लज्जपणाचा कळस आहे. पाकची चमचेगिरी करणा-यांचे तोंड राष्ट्रभक्त जनतेने काळे केले व त्यासाठी जनता टाळ्याही वाजवत आहे असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. सुधींद्र कुलकर्णी यांच्या आरोपानुसार हा हल्ला शिवसैनिकांनी केला. त्यांच्या आरोपांशी आम्ही सहमत असून देशनिष्ठा आणि देशाचे संरक्षण करणे हा महाराष्ट्राचा धंदा असून शिवसेना हा धंदा इमानेइतबारे करत आहे असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले.
देशाला खरा धोका अतिरेकी मुसलमानांपासून नव्हे तर सुधींद्र कुलकर्णींसारख्या मूठभर बाटग्यांपासून आहे.पाकिस्तानमधील किती विचारवंतांनी पाक सरकारच्या भारतविरोधी कारवायांसदर्भात सत्य बोलण्याची हिंमत दाखवली असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कसुरींच्या पुस्तक प्रकाशनासाठी जेवढा चोख पोलिस बंदोबस्त होता तो बंदोबस्त सर्वसामान्यांसाठी केला असता तर बरे झाले असते असा टोलाही त्यांनी भाजपा सरकारला लगावला आहे.