‘सैराट’ जोडीचे पोलिसांनी लावले लग्न
By Admin | Updated: June 30, 2016 20:56 IST2016-06-30T20:54:01+5:302016-06-30T20:56:23+5:30
आयुष्यभराची साथ निभविण्याचा निर्णय घेणाऱ्या ‘सैराट’ जोडीला पोलिसांनी कायद्याने मदतीचा हात दिला. सैन्य दलातील जवान अन महाविद्यालयीन युवतीचे प्रेम पोलिसांच्या परीक्षेतही उत्तीर्ण झाले

‘सैराट’ जोडीचे पोलिसांनी लावले लग्न
सुनील चौरे
हदगाव, दि. ३० : समजून... उमजून... आयुष्यभराची साथ निभविण्याचा निर्णय घेणाऱ्या ‘सैराट’ जोडीला पोलिसांनी कायद्याने मदतीचा हात दिला. सैन्य दलातील जवान अन् महाविद्यालयीन युवतीचे प्रेम पोलिसांच्या परीक्षेतही उत्तीर्ण झाले. शेवटी कुटुंबियांचे मन परिवर्तन करीत पोलिसांनी हा अनोखा विवाह सोहळा ठाण्यातच घडवून आणला.
हदगाव शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात पोलिसांनीच आंतरपाठ धरला. शेवंतीही आणली. शेवट गोड झालेल्या सैराट जोडीच्या कहाणीला २७ जून रोजी कलाटणी मिळाली होती. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूरला ढगफुटी झाली. त्याच दिवशी एका कुटुंबातील महाविद्यालयीन युवती घरातून निघून गेली होती. काकाकडे शिक्षणासाठी राहत असलेली पूजा शेजारी राहणाऱ्या शंकरची मनोमन पूजा करीत होती. गांभीर्यपूर्वक एकमेकांना आयुष्याचा साथी करण्याचा विवेकी निर्णय जोडीने घेतला.
दरम्यान शंकर सैन्य दलात दाखल झाला होता. परंतु दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मुलगी सज्ञान असली तरी तिचे शिक्षण सुरु असल्याने घरच्यांकडून संमती मिळालेली नव्हती. शेवटी तीन दिवसापासून सैराट झालेली ही जोडी हदगावच्या पोलिस ठाण्यात हजर झाली. दोघांनीही पोलिस निरीक्षक एस.एस. आमले यांना आपली कथा सांगितली. कायद्याने दोघेही सज्ञान. विचाराने पक्के. आयुष्यभराची साथ निभविण्याची तयारी अन् गांभीर्याने सैराट झालेले मन पोलिसांनाही भावले. त्यांनी मुला-मुलीच्या आई-वडिलांना, नातेवाईकांना बोलविले. त्यांची समजूत घातली. मराठा सेवा संघाचे पाटील आम्रते, गणेश बलदेवा, सुनीलभाऊ सोनुले, दत्तरामजी सुकळकर, गजानन पाटील यांनीही नातेवाईकांचे मन परिवर्तन केले. बघता-बघता पोलिस ठाण्याला मंगल कार्यालयाचे रुप आले. कार्यकर्ते, पत्रकार, नगरसेवक अशी वऱ्हाडी मंडळी जमली. पोलिस निरीक्षक आमले व गजानन पाटील यांनी वधु-वरांचे कपडे घेतले. सर्व काही रितिरिवाजाने पार पाडले. ज्येष्ठांनी आशिर्वाद दिले.