पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानीदहशतवादी तळांवर हल्ले केले. रात्री १ वाजून ०५ मिनिटांपासून ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. पहलगाम हल्ल्यात झालेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर भारतीय सशस्त्र दलाने हाती घेतले. या ऑपरेशनमध्ये कुठेही निर्दोष नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेतली गेली अशी माहिती भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. "आपल्या देशातले निष्पाप पर्यटक पहलगामला गेले होते. आपल्या मुली, आपल्या आया-बहिणींच्या समोर, लाडक्या बहिणींच्या समोर त्यांचं कुंकू पुसण्याचे काम अतिरेक्यांनी केलं. त्यांच्या कर्त्या पुरुषांना गोळ्या घालून त्यांची हत्या करण्याचं पाप केलं."
"माणुसकीला काळीमा फासण्याचं काम ज्यांनी केलं. त्या दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जशास तसं उत्तर देतील हे आम्ही आधीच सांगत होतो. आता ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींचं, मुलींचं कुंकू पुसण्याचं पाप केलं त्यांना धडा शिकविला आहे" असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. काल रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. लष्कराने मिसाईल अटॅक करून दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांना लक्ष्य केलं. या यामध्ये जैश आणि हिजबुलसारख्या दहशतवादी संघटनांचे मुख्यालय आणि लपण्याची ठिकाणे देखील समाविष्ट आहेत. याला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, काल रात्री हा हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.