Operation Sindoor Surgical Air Strike: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तावर कठोर कारवाई करत या हल्ल्याचा बदला घ्यावा, अशी जनभावना होती. पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करून प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणी एअर स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. या एअर स्ट्राइकनंतर जगभरातून प्रतिक्रिया येत असून, भारताने केलेल्या कारवाईचे अनेक देशांनी समर्थन केले आहे. यातच पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाने या प्रत्युत्तराबाबत पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत.
ऑपरेशन सिंदूर केले आहे, त्यातून त्यांनी त्या हल्ल्यातील सर्वांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिले, त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. पंतप्रधान मोदी यांनी आमच्या भावना जाणून घेतल्या. आमच्या समोरच आमचे कुंकू त्या दहशतवाद्यांनी पुसले. गोळ्या घालून त्यांनी माझ्या नवऱ्याला मारले. पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव देऊन त्या दहशतवाद्यांच्या तळावरती हल्ला केला. अतिशय योग्य आहे. हा धडा त्यांना देणे गरजेचे होते. मला खात्री होती की, आम्ही मोदींच्या मुली आहोत, ते त्यांच्या मुलींना समजून घेतील. उरी हल्ला करून आम्ही असे करू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले होते. आताही मला खात्री होती की, थोडा वेळ घेतील पण ते हल्ला करतील, अशी प्रतिक्रिया संतोष जगदाळे यांच्या पत्नीने दिली.
ही २६ जणांना श्रद्धांजली, सरकारचे आभार
आज खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांना सरकारकडून श्रद्धांजली मिळाली असे वाटते आहे. पंधरा दिवसात मिशन पूर्ण केले. मी सरकारचे आभार मानते, ज्या २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यांना आज श्रद्धांजली मिळाली आहे, असे मृत संतोष जगदाळे यांच्या कन्येने म्हटले आहे.
दरम्यान, भारताने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करत मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. तिन्ही सैन्य दलाने मिळून ही संयुक्त कारवाई केली. भारताच्या धाडसी सैन्याने पाकिस्तानच्या ४ आणि पीओकेमध्ये ५ ठिकाणी एकाचवेळी टार्गेट केले. भारतीय गुप्तचर यंत्रणा RAW ने हे सर्व टार्गेट निश्चित केले होते. ज्यानंतर पूर्ण कारवाईने लश्कर आणि जैशच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला.