CM Devendra Fadnavis: जम्मू काश्मीर येथील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशातील २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचाही समावेश आहे. डोळ्यांदेखत आपल्या जीवलगांना गमवावं लागल्याने पीडित कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबियांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारकडून वेगवान प्रयत्न सुरू असून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आणि जम्मू-काश्मिरात अडकलेल्या इतर पर्यटकांच्या सुखरूप सुटकेसाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी १२.१५ वाजता निघाले आहे. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव घेऊन येणारे विमान हे सायंकाळी ६ वाजता निघेल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन दुपारी १.१५ वाजता श्रीनगर येथून विमानातून आणले जाईल.
मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळ येथे समन्वयासाठी असतील, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत. इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान, "काश्मिरातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या क्षणी एक नागपूरकर कुटुंब सुद्धा तेथे होते. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांनी पहाडावरुन उड्या मारल्या आणि त्यात घसरुन सिमरन रुपचंदानी या जखमी झाल्या आणि त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यासमवेत तिलक आणि गर्व रुपचंदानी हे सुद्धा आहेत. तिघेही सुखरुप आहेत. त्यांच्याशी संपर्क झाला असून, त्यांना सर्व ती मदत पुरवण्यात येत आहे," अशी माहितीही मुख्यमंत्री कार्यालयाकडून रात्री देण्यात आली होती.