पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर

By Admin | Updated: September 14, 2016 16:05 IST2016-09-14T16:01:31+5:302016-09-14T16:05:46+5:30

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे २०१६ चा दया पवार स्मृती पुरस्कार कवी-लेखक वीरा राठोड, लोककला अभ्यासक-शाहीर प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे आणि छायाचित्रकार सुधारक ओलवे यांना जाहीर झाला आहे

Padma Shri Daya Pawar Memorial Award announced | पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर

पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर

>ऑनलाइन लोकमत
वीरा राठोड, प्रा. गणेश चंदनशिवे आणि सुधारक ओलवे मानकरी
मुंबई, दि. 14 - पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे २०१६ चा दया पवार स्मृती पुरस्कार कवी-लेखक वीरा राठोड, लोककला अभ्यासक-शाहीर प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे आणि छायाचित्रकार सुधारक ओलवे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा मंगळवार, २० सप्टेंबर २०१६ रोजी पु. ल. देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई सायं. ७.१५ वाजता होणार आहे. यंदाचा हा विसावा पुरस्कार सोहळा असून प्रत्येकी पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 
 
या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक जयंत पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा पवार यांनी दिली आहे.
औरंगाबाद येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या वीरा राठोड यांच्या भटक्या, बंजारा संस्कृतीवर आधारित असलेल्या `सेन सायी वेस’ या अतिशय चर्चिल्या गेलेल्या काव्यसंग्रहास साहित्य अकादमीने नुकतेच युवा साहित्य अकादमी पुरस्काने गौरवले होते. गावगाड्या बाहेर असलेल्या भटक्या विमुक्तांच्या आक्रोश कवितांच्या माध्यमातून मांडणाऱ्या वीरा राठोड यांची `पिढी घडायेरी वाते’ हा गोरबंजारा बोलीतील कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे आणि `अजिंठ्याची पारू – वाद, वास्तव आणि विपर्यास’ हा संशोधन ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे.यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित झालेले वीरा राठोड अनेक दैनिकांमध्ये स्तंभलेखनही करीत असतात.
 
बाजीराव मस्तानी चित्रपटातील `दिवानी मस्तानी’ हे गाणं गाणारे मराठवाड्याचे प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे मुंबई विद्यापिठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख म्हणून कार्यरत असून तमाशावर त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. लोककलांचे सादरीकरण आणि संशोधन अशा दोन्ही भूमिका पार पाडणाऱ्या चंदनशिवे यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या खास रांगड्या गायनशैलीचा प्रभाव पाडला असून झाकीर हुसेन, शंकर महादेवन, तौफिक कुरेशी या दिग्गजांसोबत अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगितिक कार्यक्रम करीत आहेत.
 
समाजातल्या शोषित-वंचितांचे जगणे आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करून जगासमोर मांडणाऱ्या ज्येष्ठ छायाचित्रकार सुधारक ओलवे यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. जवळपास २५ वर्षांहून अधिक काळ मुंबईच्या सर्व प्रमुख दैनिकांमध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे सुधारक ओलवे यांचे मुंबईतील सफाई कामगारांच्या भीषण वास्तवावर आधारित `न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात’ हे फोटोबुक खुप गाजले. झारखंडमधील माता-बालमृत्यू, कामाठीपुरा येथील शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांचे जीवन,  मेघालयातील आदिवासींची स्थिती अशा विविध विषयांमधून त्यांनी सामाजिक जाणीव प्रकट केली आहे. ओलवे यांनी दोनवेळा भारतभ्रमण केले आहे, तसेच परदेशातही छायाचित्रण केले आहे.
 
आतापर्यंत या पुरस्काराने प्रेमानंद गज्वी, उत्तम कांबळे, प्रकाश खांडगे, हिरा बनसोडे, गंगाधर पानतावणे, विठ्ठल उमप, रझिया पटेल, जयंत पवार, दिनकर गांगल, वामन केंद्रे, लक्ष्मण गायकवाड, उल्का महाजन, ज्योती लांजेवार, उर्मिला पवार, संजय पवार, गझलकार भीमराव पांचाळे, डॉ.जब्बार पटेल, शाहीर संभाजी भगत, लोकनाथ यशवंत, प्रतिमा जोशी, भीमसेन देठे आणि नागराज मंजुळे आदी मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.

Web Title: Padma Shri Daya Pawar Memorial Award announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.