लातूरचे डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 05:45 PM2019-01-25T17:45:29+5:302019-01-25T17:46:16+5:30

विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अशोक कुकडे यांना भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

Padma Bhushan award to Dr. Ashok Kukde | लातूरचे डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण

लातूरचे डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण

googlenewsNext

लातूर : विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अशोक कुकडे यांना भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदीर्घ काळ क्षेत्र संघचालक राहिलेल्या ८० वर्षीय डॉ. कुकडे यांनी ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत मोलाचे योगदान दिले आहे. 

मूळचे पुणे येथील डॉ. अशोक कुकडे यांनी १९६४ साली आरोग्य सेवेसाठी लातूर निवडले. तत्पूर्वी डॉ. कुकडे यांचे वैद्यकीय शिक्षण बीजे मेडिकल कॉलेज येथे झाले. ते एमबीबीएसला सुवर्णपदक विजेते होते. अन् एमएसमध्येही सर्वप्रथम आले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्ञानप्रबोधिनीचे आप्पा पेंडसे यांच्या प्रेरणेतून ग्रामीण भागात सेवा देण्याचा निश्चय डॉ. कुकडे यांनी केला. त्यांच्यासोबत पत्नी डॉ. ज्योत्स्ना कुकडे, डॉ. भराडिया, डॉ. आलूरकर लातूरला आले. काही काळ खाजगी सेवा दिल्यानंतर ट्रस्ट हॉस्पिटल उभे केले. ज्याचा विस्तार विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्र असा झाला आहे.

सामाजिक जाणिवेतून संघटित वैद्यकीय सेवा पुरविण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानने लातूरमध्ये केला. याच दरम्यान डॉ. कुकडे यांनी महाराष्ट्र, गोवा, गुजरात येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र संघचालक म्हणून काम पाहिले.  देशभर दौरे केले. अलिकडच्या काळात कॅन्सर उपचारही ग्रामीण भागात अत्यंत कमी दरात मिळावेत, यासाठी डॉ. कुकडे यांनी अथक परिश्रम घेतले. कॅन्सर केअर सेंटर उभारले. विशेष म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयाशिवाय उभारलेले देशातील एकमेव कॅन्सर केअर सेंटर विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानमुळे ग्रामीण भागात सेवेत आले. 

डॉ. अशोक कुकडे यांनी भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ, जनकल्याण समिती या शिक्षण संस्थांचेही अध्यक्षपद भूषविले असून, आजही सामान्यांच्या आरोग्य सेवेसाठी ते तत्पर आहेत. 

रिटायर बट नॉट टायर्ड : अनघा लव्हळेकर
डॉ. अशोक कुकडे व डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांची मुलगी अनघा लव्हळेकर या पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी संस्थेत मानसशास्त्र विभाग प्रमुख आहेत. वडिलांचा पद्म पुरस्काराने सन्मान होणार असल्याची वार्ता कळल्यानंतर अनघा आनंदी झाल्या. ‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, आई-वडील आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी सेवेचा ध्यास घेऊन लातूर आणि ग्रामीण भागात सामान्यांपासून सर्व स्तराच्या लोकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या. वडिलांचे जन्मगाव पुणे. जन्म २२ डिसेंबर १९३८ चा. त्यांना ८० वर्षे पूर्ण झाली. एकार्थाने ते रिटायर झाले असले तरी सेवावृत्तीत ते टायर्ड नाहीत, अर्थात् थकलेले नाहीत. 

कार्याचा बहुमान; अत्यानंद झाला : डॉ. ज्योत्स्ना कुकडे 
डॉ. अशोक कुकडे यांच्या अविरत कार्याचा हा बहुमान आहे. पद्म पुरस्काराने होणारा सन्मान हा अत्यानंदाचा क्षण आहे. स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. मात्र सेवावृत्तीचा हा यथोचित गौरव असून, यामुळे अनेकांना सेवाभाव जपण्याची प्रेरणा मिळेल, अशी प्रतिक्रिया डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांनी दिली.

Web Title: Padma Bhushan award to Dr. Ashok Kukde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर