ओझर विमानतळावरील ओल्या पार्टीची चौकशी
By Admin | Updated: February 3, 2015 01:29 IST2015-02-03T01:29:55+5:302015-02-03T01:29:55+5:30
शनिवारी रात्री ओझर विमानतळावर झालेल्या ओल्या पार्टीविरोधात दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, चौकशी सुरू झाली आहे.
ओझर विमानतळावरील ओल्या पार्टीची चौकशी
नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या सेवानिवृत्तीसाठी शनिवारी रात्री ओझर विमानतळावर झालेल्या ओल्या पार्टीविरोधात दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, चौकशी सुरू झाली आहे.
मद्यसेवनासाठी उत्पादन शुल्क विभागाचा एक दिवसाचा परवाना घेतल्याचेही उघड झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी फडणवीस यांच्याकडे पार्टीविरोधात तक्रार केली होती. बांधकाम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी घेतल्याची माहिती पोलिसांना चौकशीत दिल्याचे समजते. संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील विमानतळावरील जागेत सेवानिवृत्ताचा कार्यक्रम, तोही मद्यपान व संगीताच्या तालावर कसा होऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुळातच उत्पादन शुल्क विभागाने मद्यसेवनाचा परवाना थेट ओझर विमानतळाच्या नावाने दिलेला असल्याने हे परवानगीचे पत्र वादात सापडण्याची चिन्हे आहेत. हर्ष कन्स्ट्रक्शन यांच्यामार्फत विलास बिरारी यांनी ३१ तारखेचा एक दिवसाचा मद्यसेवनाचा परवाना काढला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनीही शासकीय जागेत दारू पिण्याचा परवाना देता येतो काय, याबाबत आपण वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविणार असल्याचे सांगितले.
मोहिते यांनी शासकीय जागेवर मद्यसेवन झाले व त्यासाठी परवानगीही घेतल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगितले. कार्यक्रमात डीजे वाजविण्याची परवानगी घेतली होती काय, डीजे कुठला होता, ग्रामस्थ व या कार्यक्रमाच्या आयोजकांत वाद झाले आहेत काय, त्याची चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)