मालकाच्या तिजोरीवर डल्ला मारणारा हमाल अटकेत
By Admin | Updated: July 13, 2016 23:06 IST2016-07-13T23:06:24+5:302016-07-13T23:06:24+5:30
मार्केट यार्डातील कांद्याच्या व्यापाऱ्याचे दुकान फोडून चोरट्याने तिजोरीतील १ लाख ३६ हजार ८२८ रुपयांची रोकड पळवली. बुधवारी पहाटे ही घटना घडली. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्याच्या

मालकाच्या तिजोरीवर डल्ला मारणारा हमाल अटकेत
सोलापूर: मार्केट यार्डातील कांद्याच्या व्यापाऱ्याचे दुकान फोडून चोरट्याने तिजोरीतील १ लाख ३६ हजार ८२८ रुपयांची रोकड पळवली. बुधवारी पहाटे ही घटना घडली. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने गुन्हा घडताच वेगाने चौकशीची सूत्रे फिरवली असता दुकानातील हमालानेच हा प्रकार केल्याचे उघड झाले असून, त्याला बुधवारी रात्री आठच्या सुमारास अटक करून चोरीतील १ लाख २ हजार ३७० रुपयोंची रोकड जप्त करण्यात यश मिळवले.
सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात (मार्केट यार्ड) मुजीब निसार अहमद खलिफा (वय ३६, रा. ६७४, पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर) यांचे मुजीब ट्रेडर्स नावाने गाळा क्रमांक १३५ मध्ये दुकान आहे. या दुकानातून कांद्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. मंगळवारी रात्री नऊ वाजता आपले नेहमीचे काम आटोपून मुजीब यांनी दुकान बंद करुन घरी गेले. बुधवारी सकाळी नऊ वाजता दुकानाकडे आल्यानंतर दुकान फोडल्याचे लक्षात येताच त्यांनी जेलरोड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून फिर्याद नोंदवली. पोलिसांनी फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध दुकानाचे शटर तोडले आणि आतील काचेच्या मुख्य दरवाजाची काच फोडून तिजोरीतील १ लाख ३६ हजार ८२८ रुपयांची रोकड चोरुन नेल्याचा गुन्हा नोंदवला.
चोरीचा गुन्हा दाखल होताच जेलरोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन बारकाईने पाहणी केली. गुन्ह्याची खबर देणारा हमाल शालम सैपन बिराजदार (वय २७, रा. आचेगाव ता. दक्षिण सोलापूर) याचे हावभाव पाहून त्याला गुन्ह्यासंबंधी विचारणा केली. यादरम्यान त्याची बोलण्यातील विसंगती आणि असमाधानकारक माहिती दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्याला पोलिसी खाक्या दाखवून पुन्हा पुन्हा विचारणा करताना तो घाबरला. प्रत्येकवेळी त्याच्या बोलण्यातून वेगवेगळी उत्तरे मिळत गेली. यातच त्याची बोबडी वळली आणि त्याने आपण रात्रीच्या सुमारास गाळ्याचे कुलूप तोडून ड्रॉव्हरमधील रोख रक्कम चोरल्याचे कबूल केले.
पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, उपायुक्त अपर्णा गीते, सुभाष नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक फारुक काझी, संतोष काणे, सहा. फौजदार बालाजी साळुंके, आप्पा सातारकर, गोविंद राठोड, बापू जंगम, दत्तात्रय बन्ने आदींनी कामगिरी यशस्वी केली.
पोलीस आचेगावला रवाना
आरोपीने कबुली देताच पोलिसांनी चोरलेली रक्कम कुठे आहे याची विचारणा करताना त्याने आपल्या गावी आचेगावला ठेवल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवून आचेगाव गाठले. चोरलेल्या १ लाख ३६ हजार ८३८ रकमेपैकी त्यांनी दिलेले १ लाख २ हजार ३७० रुपये जप्त करण्यात आले. दिवसभर हा सारा प्रकार सुरु होता. रात्री साडेसात-आठच्या सुमारास रोकड मिळवण्यात जेलरोड पोलिसांना यश मिळाले. गुन्हा घडताच तातडीने त्याचा उकल झाल्याबद्दल दुकानदार मुजीब खलिफा यांनी समाधान व्यक्त केले.