संक्रांतीनिमित्त पतंग उडविणे आनंदाचे असले तरी त्याचा मांजा कोणाचा कधी घात करेल सांगता येत नाही. नुकताच छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पीएसआयचा गळा चिरला गेला आहे. अशा अनेक घटना घडत आहेत. परंतू, या चायनिज मांजावर कुठे कुठे आणि कोण कारवाई करणार असा प्रश्न निर्माण होत आहे. बंदी असली तरीही नॉयलॉन मांजा मुंबई, पुणेच नाही तर अखंड भारत भरात विकला जातो. हाच मांजा पतंग तुटल्यावर रस्त्यावर आडवा पडतो आणि दुचाकीस्वाराच्या गळ्याला अडकून त्याचा घात करतो.
माणसाची त्वचा किती कोमल आहे आणि मांजाचा वार किती धारधार आहे हे महाराष्ट्रातील एका घटनेवरून लक्षात येत आहे. एका दुचाकीस्वाराने फुल फेस हेल्मेट घातले होते. तो जात असलेल्या रस्त्यावर मांजा आडवा पडलेला होता. तो त्याच्या तोंडावर अडकला, मांजा खूपच पातळ असल्याने तो कोणाला दिसू शकत नाही. दुचाकीस्वार जात असताना तो मांजा त्याच्या हेल्मेटमध्ये घुसला आणि दुचाकीस्वार वाचला.
जर या दुचाकीस्वाराने हाफ फेस हेल्मेट घातले असते किंवा हेल्मेटच घातले नसते तर त्याचा त्यावेळी गळा चिरला गेला असता किंवा तोंडावर कापले गेले असते. मांजाची तीव्रता तुम्ही तो कसा टणक प्लॅस्टिकमध्ये घुसला आहे हे दिसून येईल. काळ आला होता, मांजाने वारही केला होता, पण हेल्मेटने तो आपल्यावर घेतला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मांजाचा वापर नको...नायलॉन मांजाचा वापर करणे चुकीचे आहे. दुकानदार त्यांच्या फायद्यासाठी तो विकतात. नायलॉन मांजा टिकाऊ असल्याने तसेच दुसऱ्याचा दोर कापण्यासाठी धारधार असल्याने पतंग उडविणारे देखील यालाच पसंती देतात. परंतू हा मांजा एखाद्याचा जीव घेतो, एखाद्याचा संसार उध्वस्त करतो. संक्रांतीचा सण कित्येकांच्या जिवावरही बेतलेला आहे. यामुळे सुती मांजाचा वापर करण्याचे आवाहन पोलिस, प्रशासन करत आहे.