रात्रभर ‘ते’ राखेत शोधत होते संसार
By Admin | Updated: June 2, 2014 05:42 IST2014-06-02T05:42:51+5:302014-06-02T05:42:51+5:30
संत गाडगेबाबा नावाची गडचांदूर येथील मजुरांची वसाहत आगीने पार होरपळून निघाली आहे. टिचभर पोटासाठी मोलमजुरी करून आयुष्याचा गाडा कसाबसा ते चालवित होते.

रात्रभर ‘ते’ राखेत शोधत होते संसार
गडचांदूर: संत गाडगेबाबा नावाची गडचांदूर येथील मजुरांची वसाहत आगीने पार होरपळून निघाली आहे. टिचभर पोटासाठी मोलमजुरी करून आयुष्याचा गाडा कसाबसा ते चालवित होते. मात्र ते नियतीला मान्य नसावे. शनिवारी आगीच्या एका ठिणगीने ६०० लोकांना रस्त्यावर आणले आणि पाहता पाहता क्षणात त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. आज त्यांच्याजवळ पाणी पिण्यासाठी साधा ग्लासही उरला नाही. शनिवारी रात्री अन्नपिण्याविनाच आगग्रस्तांनी अख्खी रात्रं जागून काढली. विझलेल्या राखेत उरलेले काही गवसते का, याचे ते शोध घेत होते. ३१ मेच्या दुपारी गडचांदूर येथे घडलेल्या आगीच्या घटनेने अख्खी पंचक्रोशी सुन्न झाली आहे. आगीच्या लोळात १३७ संसार उद्ध्वस्त झालेत. घटनेनंतर ग्रामपंचायतीच्यावतीने आगग्रस्तांसाठी जेवण व झोपण्याची व्यवस्था केली होती. मात्र डोळ्यादेखत घराची राखरांगोळी झाल्याने कुणाच्याही पोटात अन्न गेले नाही. झोप येण्याचा तर प्रश्नच नव्हता. व्यवस्था असूनही आगग्रस्त कुटुंबातील सदस्यांनी दुसर्या दिवशी सोमवारी देखील जेवण केले नाही. सारेच मोलमजुरीवर जगणारे असल्याने पीडित कुटुंबावर फार मोठा आघात झाला आहे. प्रमोद कवडू उईके यांच्या नातेवाइकाचा विवाह असल्यामुळे त्यांनी शुक्रवारीच १० हजार रुपये घरी आणून ठेवले होते. मात्र पैशाची राख झाली. नव्याने विवाह झालेल्या अनेकांचे अहेरात आलेले संसारोपयोगी साहित्य व सोने आगीत भस्मसात झाले. रमेश लिंगाजी यांच्या नातीचे ६ जूनला नामकरण होते. त्यासाठी जुळवून ठेवलेले २७ हजार रुपये व धान्य आगीत स्वाहा झाले. राजाराम शेडमाके अणि कमलाबाई शेडमाके हे वृद्ध दाम्पत्य आहे. त्यांना कुणाचा आधार नाही. चप्पच, जोडे विकून प्रसंगी गरिबांच्या लग्नात वाजंत्री वाजवून त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र या आगीत १०० जोडी चप्पल व काही जोड्यांसह वाजवायचे डफडेही आगीच्या भक्षस्थानी सापडले. त्यामुळे या दाम्पत्यासमोर आता जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे. फारुख शाह कदीर शाह यांचे लग्न जुळले होते. सोमवारी लग्नाची तारीख काढायची होती. लग्नासाठी घेऊन ठेवलेले ६० हजार रुपयांचे सोने या आगीत जळून खाक झाले. माणिकगड कंपनीमध्ये २००४ मध्ये रोप वेवरून पडून अपघात झाल्याने एका पायाने अपंग झालेला राजरतन विश्वनाथ फुल्लुके याच्या यातना तर भयावह आहेत. कुटुंबात फक्त पती- पत्नी असून हे दाम्पत्य मनी, बिर्या कमरपट्टा आदी साहित्य विकून आपल्या पोटाची खळगी भरत असत. मात्र या आगीत सर्व साहित्य जळाले. विश्वनाथ गणपती बरवे व बयाबाई गणपती बरवे हे वृद्ध दाम्पत्य दुसर्यांच्या शेतात मोलमजुरी करतात. त्यांना मात्र वयाच्या उत्तरार्धात असे दिवस पाहावे लागले. अनिल मुकिंदा आरकिलवार याचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर पायातील रॉड तुटल्याने त्याला चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्याच्या उपचारासाठी आईवडिलांनी नातेवाइकांकडून ५० हजार रुपये कर्ज काढले होते. ही रक्कम घरातच होती. आगीत हजार- पाचशेच्या सर्वच नोटा जळाल्या व वर्षभराचे घेऊन ठेवलेले धान्यही जळून खाक झाले. शासकीय सर्व्हेक्षणानंतर एक कोटी ८७ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले असून ८६ कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.(शहर प्रतिनिधी)