थकबाकीदार अध्यक्षही ठरतो अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 11:18 PM2020-02-07T23:18:16+5:302020-02-07T23:18:32+5:30

गृहनिर्माण संस्था म्हणजेच सोसायटीचा कारभार करताना समोर येणारे प्रश्न

The outstanding president also becomes ineligible | थकबाकीदार अध्यक्षही ठरतो अपात्र

थकबाकीदार अध्यक्षही ठरतो अपात्र

Next

- अ‍ॅड. एस. एस. देसाई

प्रश्न : माहिममधील एक गृहनिर्माण संस्था यामध्ये मी सभासद आहे. संस्थेचे अध्यक्ष हे थकबाकीदार झाले आहेत. तसे वृत्त संस्थेच्या वार्षिक अहवालामध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यांची थकबाकी ही गेल्या ६/८ महिन्यांची आहे. परंतु ते संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. अशा परिस्थितीत ते संस्थेच्या कार्यकारी समितीमध्ये सदस्य राहू शकतात किंवा कसे याचे मार्गदर्शन व्हावे.

उत्तर : कोणताही सभासद हा निवडून येण्यास, स्वीकृत होण्यास किंवा कार्यकारी मंडळावर काम करण्यास अपात्र ठरतो जर तो थकबाकीदार असेल, असे स्पष्टपणे महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० तसेच संस्थेच्या उपविधीमध्ये तरतूद आहे. सबब या स्पष्ट तरतुदीनुसार संस्थेचे अध्यक्ष हे समितीवर राहण्यास निश्चितच अपात्र आहेत. अशा स्थितीमध्ये संस्थेच्या कार्यकारिणीने त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे.

अध्यक्ष जर थकबाकीदार असतील तर त्यांना सचिवामार्फत थकबाकी देण्याची/संपूर्ण रक्कम भरण्याची नोटीस द्यावी. नोटीस कालावधीमध्ये थकबाकी रक्कम न भरल्यास त्यांची तक्रार उपनिबंधक कार्यालयास करण्यात यावी. जेणेकरून उपनिबंधक कार्यालयामार्फत अशा थकबाकीदार सदस्यावर योग्य ती कारवाई करून समितीवरून काढून २२टाकण्याची प्रक्रिया व आदेश देता येईल.परंतु अपात्रता असल्यास त्याची दखल घेऊन तसे आदेश पारित व्हावे लागतात. सदस्य अपात्र झाल्यावर त्याचे पद आपोआप रद्द होत नाही. कार्यकारिणी जर याविषयी दिरंगाई करीत असेल तर कोणत्याही सभासदास तशी तक्रार उपनिबंधक कार्यालयामध्ये करता येते व अपात्र सभासदास समितीवरून काढता येते.

प्रश्न : मी एक मोठ्या गृहसंकुलामध्ये राहत आहे़ माझ्या गृहसंकुलामध्ये तीन प्रकारची गृहरचना आहे़ २ बीएचके, ३ बीएचके व ४ बीएचके़ विकासकाने सर्व सदनिका विकल्या आहेत व त्याचा ताबादेखील दिला आहे़ गृहनिर्माण संस्था नोंदणीकृत केली आहे़ परंतु संस्था योग्य पद्धतीने चालत नसल्याने त्यावर प्रशासकाची नियुक्ती केली आहे़ प्रशासक हे संस्थेतील तीन सदस्य आहेत व त्यांचे मंडळ आहे़ प्रशासक मंडळाचे अधिकार व कार्यकक्षा यांवर मार्गदर्शन व्हावे.

उत्तर : प्रशासक मंडळ नेमण्याचे अधिकार हे निबंधक कार्यालयाला असतात़ आपल्या समस्येवरून असे निदर्शनास येते की, निबंधक कार्यालयाने प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे़ सध्या नियुक्त प्रशासक मंडळाचे अधिकार हे त्यांच्या नेमणुकीच्या आदेशामध्ये असतात़ सबब प्रशासक मंडळाच्या आदेशाचे अवलोकन करणे आवश्यक आहे. परंतु सर्वसाधारणपणे संस्थेचे सर्व दैनंदिन कामकाज व इमारत, संस्था यांची देखभाल करण्याची जबाबदारी ही प्रशासक मंडळाची असते.

 प्रशासक मंडळाने संस्थेची निवडणूक करून, निवडून आलेल्या मंडळाच्या हाती प्रशासक मंडळ द्यावे़ प्रशासक मंडळ हे दैनंदिन कामकाज करण्यास स्वतंत्र असते. काही महत्त्वाचे व धोरणात्मक निर्णय हे केवळ निबंधक व सर्वसाधारण सभा यांच्या मंजुरीने करणे अपेक्षित आहे़ प्रशासक मंडळ हे मुख्यत: कार्यकारिणीऐवजी संस्थेचा कार्यभार पाहत असते़ प्रशासक मंडळ हे त्यांनी केलेल्या कामकाजास जबाबदार असते.

वरील विवेचन हे महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० मधील तरतुदीनुसार आहे़ संस्था स्तरावर प्रशासक मंडळाला अनेक बाबी कराव्या लागतात़ प्रशासक मंडळ हे केवळ नियुक्त केलेल्या कालावधीकरिता असते.

Web Title: The outstanding president also becomes ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.