ठाणे स्थानकाबाहेर २000 दुचाकींचे पार्किंग; एक मजल्याची पार्किंग इमारत
By Admin | Updated: January 31, 2015 05:30 IST2015-01-31T05:30:41+5:302015-01-31T05:30:41+5:30
मुंबईतील पार्किंग समस्येने रेल्वे स्थानकांनाही या ग्रासले आहे. स्थानकाबाहेर प्रवाशांच्या वाहनांची एकच गर्दी होत असल्याने वाहतुक

ठाणे स्थानकाबाहेर २000 दुचाकींचे पार्किंग; एक मजल्याची पार्किंग इमारत
मुंबई : मुंबईतील पार्किंग समस्येने रेल्वे स्थानकांनाही या ग्रासले आहे. स्थानकाबाहेर प्रवाशांच्या वाहनांची एकच गर्दी होत असल्याने वाहतुक कोंडीबरोबरच अन्य प्रवाशांनाही मनस्तापाला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून रेल्वेकडून पार्किंगची व्यवस्था केली जात असून ठाणे स्थानकाबाहेर एक मजली पार्किंग इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात दोन हजार दुचाकींसाठी पार्किंगची व्यवस्था असेल. या कामाची निविदा येत्या दोन ते तीन दिवसांत काढण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.
वाहने उभे करण्यासाठी वाहन मालकाकडून जोपर्यंत जागा उपलब्ध असल्याचे सांगितले जात नाही, तोपर्यंत वाहनांची नोंदणी होणार नाही,अशा अटीची योजना असलेली सूचनाही नुकतीच उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. यातून पार्किंगची समस्या किती मोठी आहे हे न्यायालयाने दाखवून दिले. रेल्वे स्थानकांबाहेर मोठ्या प्रमाणात वाहनांची पार्किंग केली जाते. ठाणे स्थानकाबाहेर तर पार्किंगचा प्रश्न अधिक गहन झाला असून ती सोडविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या स्थानकाच्या पश्चिमेला सॅटिस, टीएमटी बसेस जाण्यासाठी पुल असून त्या खालून जाणाऱ्या रिक्षा आणि दुचाकी आणि अन्य वाहनांची संख्या अधिक असते. तसेच दुचाकीस्वार तर स्थानकाबाहेरच पार्किंग करुन जातात. हे पाहता ठाणे स्थानकाच्या एक नंबर प्लॅटफॉर्मबाहेर असलेल्या रेल्वेच्या जागेत एक मजली इमारत वाहन पाार्किंगसाठी उभारली जाणार आहे.
याबाबत मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांनी सांगितले की, या इमारतीत फक्त दुचाकींचे पार्किंग होईल. दोन हजार दुचाकींच्या पार्किंगसाठी ही व्यवस्था असेल. या कामाची दोन ते तीन दिवसांत निविदा काढली जाणार असून हे काम या डिसेंबर महिन्यापूर्वी ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. (प्रतिनिधी)