भाजपाच्या कोणत्याही नेत्याला आमचा पाठिंबाच - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: October 27, 2014 15:13 IST2014-10-27T15:13:31+5:302014-10-27T15:13:31+5:30
जनतेने दिलेल्या आशीर्वादाचे सोने करुन महाराष्ट्राचे रथ पुढे नेणा-या मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा राहील असे सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

भाजपाच्या कोणत्याही नेत्याला आमचा पाठिंबाच - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - निवडणुकीपूर्वी भाजपावर घणाघाती टीका करणा-या शिवसेनेने आता भाजपासमोर शरणागती पत्कारल्याचे दिसते. जनतेने दिलेल्या आशीर्वादाचे सोने करुन महाराष्ट्राचे रथ पुढे नेणा-या मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा राहील असे सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. दिल्लीतील भाजपा पक्षश्रेष्ठींचे देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद लाभत असले तरी नितीन गडकरी यांच्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तास्थापनेविषयी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या घोटाळेबाजांना सत्ता मिळण्यापेक्षा भाजपाला सत्ता मिळतेय यातच आम्हाला आनंद आहे. भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु आहे. मुख्यमंत्रीही कोणीही होवोत, राज्याच्या जनतेने दिलेल्या आशीर्वादाचे सोने करुन राज्याला पुढे नेणा-या नेत्याला शिवसेना साथ देईल असे विधान करत उद्धव ठाकरेंनी भाजपाला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत.
एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश जावडेकर, पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आदी नेते मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आहे. मात्र यामध्ये खरी चुरस गडकरी आणि फडणवीस यांच्यात आहे. गडकरींकडे विकासाचे व्हिजन आहे तर फडणवीस यांच्याकडे विधानसभेचा दांडगा अनुभव आहे. पण मंत्रीपदाचा त्यांना अनुभव नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.