विदर्भ आमच्या हक्काचा...

By Admin | Updated: July 30, 2016 03:27 IST2016-07-30T03:27:58+5:302016-07-30T03:27:58+5:30

‘विदर्भ आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा’ अशा जोरदार घोषणा देत भाजपाच्या विदर्भातील तब्बल २० आमदारांनी आज सभागृह आणि विधिमंडळाचा परिसर दणाणून सोडला.

Our right to Vidarbha ... | विदर्भ आमच्या हक्काचा...

विदर्भ आमच्या हक्काचा...

मुंबई : ‘विदर्भ आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा’ अशा जोरदार घोषणा देत भाजपाच्या विदर्भातील तब्बल २० आमदारांनी आज सभागृह आणि विधिमंडळाचा परिसर दणाणून सोडला.
स्वतंत्र विदर्भाच्या लोकसभेतील ठरावावरून सुरू असलेल्या गदारोळात शिवसेनेचे सुनील प्रभू, १०५ हुतात्म्यांचे बलिदान शिवसेना वाया जाऊ देणार नाही. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे षड्यंत्र हाणून पाडले जाईल आणि ज्यांना विदर्भ हवा आहे त्यांनी चालते व्हावे, असे म्हणू लागले. तेव्हा भाजपाचे हे आमदार अत्यंत आक्रमक झाले. चैनसुख संचेती, आशिष देशमुख, सुधाकरराव देशमुख, अनिल बोंडे, चरण वाघमारे, रामचंद्र अवसरे, सुधाकर कोहळे, डॉ. देवराम होळी, कृष्णा गजबे, संजय पुराम, विकास कुंभारे, समीर कुणावार, डॉ. मिलिंद माने यांच्यासह भाजपाचे २० आमदार पुढे सरसावले. स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी त्यांनी सुरू केली. आम्हालाही बोलू द्या, असे म्हणत हे आमदार वेलमध्ये उतरले.
गदारोळात कामकाज संपल्यानंतर हे आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर आले आणि त्यांनी ‘विदर्भ आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा’ अशी घोषणा दिली. त्यामुळे वातावरण तापले. (विशेष प्रतिनिधी)


विदर्भ मुद्द्यावरून रावते अन् भाजपा आमदार भिडले
‘महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव आम्ही हाणून पाडू. विदर्भासाठी तुम्ही एवढे ओरडताहात तर मग आधी राजीनामे देऊन बाहेर पडा अन् मग खुशाल मागा, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सुनावताच भाजपाचे विदर्भातील आमदार आणि त्यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. काही क्षण दोघेही एकमेकांच्या दिशेने धावून गेले.
रावते संतप्त होऊन बोलत असताना भाजपाचे आमदार रामचंद्र अवसरे (भंडारा) आणि चरण वाघमारे (तुमसर) यांच्याशी त्यांची बाचाबाची झाली. ‘तुम्ही आमचे राजीनामे मागणारे कोण, आमचा पक्ष आमचे काय करायचे ते पाहून घेईल, असे अवसरे आणि वाघमारे यांनी सुनावले.
शिवसेनेचे काही आमदार रावतेंच्या समर्थनार्थ धावल्याने दोन सत्तारूढ पक्षांमधील संघर्ष समोर आला. गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब झालेले असताना हा प्रकार घडला. रावतेंना आवरण्यासाठी तसेच भाजपा आमदारांना शांत करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मध्ये पडले.
बाका प्रसंग ओळखून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हेही सत्तारूढ बाकांच्या जवळ येऊन सगळ्यांना समजावू लागले. काही मिनिटांत वातावरण शांत झाले.

Web Title: Our right to Vidarbha ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.