अन्यथा..कल्याण पश्चिमेतील राष्ट्रवादीचे आव्हान संपुष्टात!

By Admin | Updated: October 10, 2014 01:03 IST2014-10-10T01:03:55+5:302014-10-10T01:03:55+5:30

आघाडीत बिघाडी झाली अन् काँग्रेस-राष्ट्रवादी वेगवेगळे लढत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारांची तयारी नसतानाही मारून-मुटकून उमेदवार उभे करून त्यांना बाहुल्यावर चढवण्यात आले आहे

Otherwise, the NCP challenge of Kalyan West is over! | अन्यथा..कल्याण पश्चिमेतील राष्ट्रवादीचे आव्हान संपुष्टात!

अन्यथा..कल्याण पश्चिमेतील राष्ट्रवादीचे आव्हान संपुष्टात!

कल्याण : आघाडीत बिघाडी झाली अन् काँग्रेस-राष्ट्रवादी वेगवेगळे लढत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारांची तयारी नसतानाही मारून-मुटकून उमेदवार उभे करून त्यांना बाहुल्यावर चढवण्यात आले आहे. त्यातच पक्षांतर्गत बंडखोरीच्या राजकारणामुळे संबंधित उमेदवारांना जिंकण्याचाही आत्मविश्वास नसल्याचे एकंदरीतच दिसून येत आहे. अशीच काहीशी स्थिती कल्याण पश्चिम मतदारसंघातील विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. त्या तुलनेने काँग्रेससाठीही वेगळे लढण्याची पहिलीच निवडणूक असली तरीही त्यांनी प्रचारात जम बसविल्याचे दिसून येत आहे.
येथे राष्ट्रवादीला बंडाळीचे ग्रहण लागले असून ‘मला नाही तर तुलाही नाही’ अशा विचित्र कचाट्यातून अधिकृत उमेदवाराला जावे लागत आहे. बंडाळीमुळेच कार्यकर्तेही संभ्रमात असून जाये तो जाये किधर, अशी स्थिती होण्यापेक्षा पक्षाचेच अधिकृत आणि बंड पुकारलेले उमेदवार समोर आले की, ‘देखल्या देवा दंडवत’ घालण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांच्या प्रचार फेऱ्यांच्या धबडग्यात हे स्पष्टपणे दिसून आले.
शहरातील पश्चिमेकडील भागात सर्वच पक्ष रॅली-फेऱ्यांमधून एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करत असताना या पक्षाच्या उमेदवाराचीही रॅली निघाली, पण त्यात कार्यकर्त्यांचा अभाव होता. जी फेरी निघाली होती, त्यामध्ये मरगळ होती. सुरुवातीपासून रॅली संपुष्टात येईस्तोवर मात्र शेकड्यांच्या घरात ही संख्या कशीबशी गेल्याचे दिसून आले.
याबाबत, समर्थकांशी चर्चा केल्यावर ऐनवेळी ही निवडणूक लढवण्यात आल्याने नियोजन कमी पडत असून समन्वयाचा प्रचंड अभाव असल्याचे सांगण्यात आले. उमेदवार कॅपेबल आहे की नाही, हे निवडणूक निकालात ठरेल़ परंतु, पक्ष म्हणून जेवढा प्रभाव दिसायला हवा, तेवढा कल्याणात राष्ट्रवादी काँग्रेसचा दिसून येत नाही.
आघाडीच्या वेळी कल्याणातील दोन्ही मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आले होते. मात्र, या वेळेस अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत वेगळे लढावे लागणार, याची सुतराम शक्यता नव्हती. तुलनेने काँग्रेसमध्ये मात्र लढायचेच असल्याने नियोजनासह विविध प्रकारची तयारी जास्त असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीची निवडणूक कार्यालयेदेखील शोधावी लागत आहेत, अशी स्थिती आहे, तर काँग्रेसने मात्र मोक्याच्या जागा आधीच काबीज केल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पाचावर धारण बसली आहे.

Web Title: Otherwise, the NCP challenge of Kalyan West is over!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.