सरकार अन् भाजपात समन्वयासाठी ओएसडी

By Admin | Updated: October 1, 2015 03:21 IST2015-10-01T03:21:27+5:302015-10-01T03:21:27+5:30

राज्य सरकार आणि भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात समन्वय राखण्यासाठी आता मुख्यमंत्री

OSD for coordination between government and BJP | सरकार अन् भाजपात समन्वयासाठी ओएसडी

सरकार अन् भाजपात समन्वयासाठी ओएसडी

मुंबई : राज्य सरकार आणि भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात समन्वय राखण्यासाठी आता मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून श्रीकांत भारतीय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आजपासून कामकाज सुरू केले.
सरकार आणि भाजपात समन्वय नसल्याची ओरड सातत्याने होत होती. कोल्हापुरात झालेल्या भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत खुद्द पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या दोहोंमध्ये समन्वयाची स्थायी व्यवस्था असली पाहिजे, असा आग्रह धरला होता. या पार्श्वभूमीवर, पक्षाबरोबरच संघाशीही संपर्क ठेवून या दोन्हींची मते सरकारला कळविणे आणि सरकारला असलेल्या अपेक्षा पक्ष संघटनेला कळविणे अशी दुहेरी जबाबदारी भारतीय यांच्यावर असेल. मुख्यमंत्री कार्यालय आणि इतर मंत्री कार्यालयांमध्ये समन्वयाचे कामदेखील त्यांच्याकडे असेल, असे समजते.
श्रीकांत भारतीय हे अमरावतीचे असून भाजपाचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून आलेले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणेचे समन्वयक होते. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिक्षण मंत्री तावडे यांचे जवळचे मित्र तसेच केंद्रीय मंत्री गडकरी आणि वित्त मंत्री मुनगंटीवार यांचे निकटवर्ती अशी त्यांची ओळख आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: OSD for coordination between government and BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.