'ऑर्कुट' वी मिस यू..!
By Admin | Updated: July 4, 2014 09:22 IST2014-07-04T09:21:59+5:302014-07-04T09:22:13+5:30
गुगलने ऑर्कुट बंद करण्याचा निर्णय घेतला. याच धर्तीवर अखेरची 'ऑर्कुटवारी' करण्याचे आवाहन मूड इंडिगोच्या टीमने फेसबुकवर केले आहे.

'ऑर्कुट' वी मिस यू..!
तरुणाईची भावना : मूड इंडिगोच्या टीमची 'आयडिया'
मुंबई : फेसबुक, व्हॉट्सअँप, चॅटऑन, व्ही चॅट, गुगल हँगआऊट, ट्विटर अशा डझनभर सोशल मेसेंजरमध्ये प्रत्येक जण 'बिझी' असतो. मात्र कित्येक वर्षांपूर्वी 'ऑर्कुट'ने सोशल नेटवर्किंग मेसेजिंगमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. ऑर्कुटमध्ये स्क्रॅप पाठविणे, स्टेटस ठेवणे, फोटोज् ही मजा वेगळीच होती. पण आता गुगलने ऑर्कुट बंद करण्याचा निर्णय घेतला. याच धर्तीवर अखेरची 'ऑर्कुटवारी' करण्याचे आवाहन मूड इंडिगोच्या टीमने फेसबुकवर केले आहे.
'ऑर्कुट'ने सर्वांत आधी यंगस्टर्सला भुरळ घातली. ऑर्कुटमधील टेस्टीमॉनिअल, कम्युनिटीज्, स्टेटस, फ्रेंड रिक्वेस्ट, स्क्रॅपबुक या सगळ्यात तरुणाई रमलेली असायची. याचीच आठवण पुन्हा एकदा करून देण्यासाठी मूड इंडिगोच्या टीमने फेसबुकवर शेवटच्या 'ऑर्कुट' भेटीची कल्पना मांडली आहे. या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, शिवाय 'बोअर' झालेल्या फेसबुक आणि व्हॉट्सअँपच्या गर्दीतून चेंज मिळेल, असे या टीमचे म्हणणे आहे.
ऑर्कुटच्या जुन्याच अकाउंटमधील काही 'हटके' स्क्रॅप्स आणि फोटोज् पुन्हा मूड इंडिगोच्या फेसबुक पेजवर शेअर करण्याचे आवाहन या टीमने केले होते. त्यातून ७२ तासांदरम्यान येणार्या फोटोज् आणि स्क्रॅप्समधून काही विजेते निवडणार आहेत. त्यांना मूड इंडिगोच्या टीमकडून पारितोषिकही देण्यात येणार आहे. या आयडियाची कॉलेजिअन्समध्ये चर्चा आहे. कित्येक वर्षांपूर्वी दुरावलेल्या या 'ऑर्कुट' अकाउंटचा पासवर्ड किती जणांच्या लक्षात आहे, ही वेगळीच परीक्षा आहे. 'ऑर्कुट' बंद होत असताना सर्वांच्याच मनात 'वी रिअली मिस यू' अशाच काहीशा भावना आहेत. (प्रतिनिधी)