‘आॅर्गनायझर’वरून विरोधकांनी केला सभात्याग!
By Admin | Updated: March 14, 2015 05:01 IST2015-03-14T05:01:23+5:302015-03-14T05:01:23+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘साप्ताहिक आॅर्गनायझर’मध्ये छापण्यात आलेल्या वादग्रस्त भारतीय नकाशावरून विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले.

‘आॅर्गनायझर’वरून विरोधकांनी केला सभात्याग!
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘साप्ताहिक आॅर्गनायझर’मध्ये छापण्यात आलेल्या वादग्रस्त भारतीय नकाशावरून विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले. या विषयावर केलेली चर्चेची मागणी फेटाळण्यात आल्यामुळे संतप्त विरोधकांनी सभात्याग केला.
रा. स्व. संघाच्या मुखपत्रात छापण्यात आलेल्या भारतीय नकाशातून काश्मीरचा भूभाग पाकिस्तानमध्ये दाखविण्यात आला होता. यावर नियम २८९ अन्वये लोकभारतीच्या कपिल पाटील यांनी चर्चेची मागणी केली. रा. स्व. संघाच्या या मुखपत्रात काश्मीरचा भाग पाकिस्तानला बहाल करण्यात आला आहे. हा देशाच्या सार्वभौमत्वावरचा घाला असून, सरकारने याबाबत आपली भूमिका मांडावी, अशी मागणी पाटील यांनी केली. तर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माणिकराव ठाकरे, हेमंत टकले यांनीही चर्चेची मागणी केली.
संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सरकारची बाजू मांडली. नजरचुकीने हा नकाशा छापण्यात आला असला तरी ती चूक अक्षम्य आहे. यापुढे असा प्रकार घडणार नाही, असे सांगत आॅर्गनायझरच्या संपादकांनी या प्रकरणावर आधीच माफी मागितली आहे. चुकीचा नकाशा त्यांनी संकेतस्थळावरून काढूनही टाकला; शिवाय या प्रकरणाचा सरकारशी अथवा राज्याशी संबंध नाही, असे बापट यांनी सांगितले. यानंतर पिठासीन अधिकाऱ्यांनी सरकारला अधिक माहिती घेऊन सभागृहात निवेदन करण्याचे निर्देश देत चर्चेची मागणी फेटाळली. त्यामुळे विरोधकांनी संघाविरोधात घोषणा देत सभात्याग केला. (प्रतिनिधी)