कागदांवरील संस्था प्रत्यक्षात उभारणार
By Admin | Updated: December 25, 2014 00:24 IST2014-12-25T00:24:49+5:302014-12-25T00:24:49+5:30
गेल्या दोन वर्षांत उपराजधानीत दर्जेदार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या घोषणा झाल्या आहेत. काही ना काही अडचणींमुळे या अद्याप कागदावरच असल्या तरी यांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे

कागदांवरील संस्था प्रत्यक्षात उभारणार
विनोद तावडे : नागपुरात शैक्षणिक ‘हब’ होण्याची क्षमता
योगेश पांडे - नागपूर
गेल्या दोन वर्षांत उपराजधानीत दर्जेदार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या घोषणा झाल्या आहेत. काही ना काही अडचणींमुळे या अद्याप कागदावरच असल्या तरी यांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येतील. जागा तसेच निधीअभावी कुठल्याही संस्थेची स्थापना अडणार नाही याची दक्षता घेऊ, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले. राज्यातील पहिल्या ‘आयआयएम’साठी नागपूरचे नाव केंद्राकडे पाठविण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केल्यानंतर, तावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
मध्य भारतातील शैक्षणिक केंद्र म्हणून नागपूरने स्वत:ची ओळख प्रस्थापित केली आहे. गेल्या दोन वर्षांत नागपूरसाठी ‘ट्रिपल आयटी’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी या संस्थांना मंजुरी मिळाली.
परंतु घोषणा होऊनदेखील वरील तीनपैकी एकही संस्था प्रत्यक्षात सुरू झालेली नाही. सर्व शिक्षण संस्था या अजूनही कागदपत्रांतच अडकल्या आहेत.
‘ट्रिपल आयटी’ची गाडी जागेवरून अडली आहे. वर्धा मार्गावरीलच मौजा वारंगा येथील १०० एकरच्या जागेला अद्याप केंद्राची हिरवी झेंडी मिळालेली नाही. ‘महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी’च्या जागेलादेखील राज्य शासनाची मंजुरी मिळालेली नाही. तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची ‘आॅटोमोटिव्ह’चौकाजवळील मौजा वांजरी येथील ७.४७ जागा अद्याप शासनाकडून निधी न मिळाल्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या ताब्यात आलेली नाही.
यासंदर्भात तावडे यांना विचारणा केली असता, वरील सर्व अडचणींचा अभ्यास करण्यात येत असून, लवकरात लवकर प्रत्यक्ष काम सुरू होण्याकरिता आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जागेसाठी निधीची कमतरता येणार नाही.
अधिवेशन आटोपल्यामुळे आता या बाबींकडे प्रामुख्याने लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरमध्ये निश्चितच शैक्षणिक ‘हब’ होण्याची क्षमता असून, त्यादृष्टीने शासनाकडून पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले.