डान्सबारविरोधात संघटनांची निदर्शने
By Admin | Updated: May 7, 2016 02:03 IST2016-05-07T02:03:49+5:302016-05-07T02:03:49+5:30
राज्यातील डान्सबार कोणत्याही परिस्थितीत सुरू होता कामा नये, अशी मागणी करीत शुक्रवारी विविध सामाजिक संघटनांनी आझाद मैदानात निदर्शने केली. राज्यात एकतरी डान्सबार

डान्सबारविरोधात संघटनांची निदर्शने
मुंबई : राज्यातील डान्सबार कोणत्याही परिस्थितीत सुरू होता कामा नये, अशी मागणी करीत शुक्रवारी विविध सामाजिक संघटनांनी आझाद मैदानात निदर्शने केली. राज्यात एकतरी डान्सबार सुरू झाला, तर सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनाच्या निमंत्रक आमदार विद्या चव्हाण यांनी दिला.
चव्हाण म्हणाल्या की, सर्व संघटनांचा विरोध डान्सबारला असून बारबालांना नाही. काही संघटना उगाचच बारबालांचा आकडा फुगवून सांगत आहेत. राज्यात १७ हजारांच्या आसपास बारबाला असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत. संघटनेत असलेल्या उद्योजकांमार्फत अधिकाधिक महिलांना रोजगार देण्याचे काम केले जाईल. मात्र चैन करण्याइतपत पगार न देता उदरनिर्वाहापुरता पगार नक्कीच महिलांना मिळेल.
केवळ जाचक अटी टाकून डान्सबारवर बंदी घालता येणार नसल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, सरकारने कायद्यातील पळवाटा शोधून कडक कायद्याची निर्मिती करायला हवी. त्याशिवाय डान्सबारवर संपूर्ण बंदी शक्य होणार नाही. शिवाय न्यायालयातही त्याचा टीकाव लागेल. मात्र डान्सबार बंदी टिकवण्यात सरकारची इच्छाशक्ती कमी दिसत आहे. यावेळी निदर्शनांमध्ये स्त्री शक्ती संघटना, घरहक्क जागृती मंच, सद्भावना संघ, जमात ए इस्लामी या संघटनांसह इतर संघटनाही सामील झाल्या होत्या. निदर्शनांमध्ये मुस्लीम महिलांची संख्या अधिक होती. काही हजार महिलांसाठी न्यायालयाने लाखो लोकांच्या संसारावर वरवंटा फिरवू नये, अशा संतप्त प्रतिक्रिया महिलांमधून उमटल्या. (प्रतिनिधी)