मुंबई : हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी)साठी राज्यातील तीन झोनमध्ये निवडण्यात आलेल्या संस्थांच्या माध्यमातून २२ जुलैपर्यंत एकूण ५२ लाख ५० हजार अर्ज आले असून, त्यातील २५ लाखांपेक्षा जास्त वाहनांना एचएसआरपी बसविण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल, कल्याण, पेण, रत्नागिरी, सातारा आदींसह राज्यातील १६ आरटीओंचा समावेश असलेल्या दुसऱ्या झोनमध्ये सर्वाधिक ऑर्डर नोंदविण्यात आल्या आहेत. २०१९ पूर्वीच्या गाड्यांना एचएसआरपी बसविण्यासाठी १५ ऑगस्ट ही अंतिम तारीख असल्याने या तारखेनंतर ऑर्डर करणाऱ्या वाहनांना दंड आकारण्यात येणार असल्याचे अधिकारी म्हणाले.राज्यात २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सुमारे २ कोटी वाहनांवर एचएसआरपी बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या कामासाठी राज्यातील आरटीओ कार्यालयांसाठी तीन झोनमध्ये ३ वेगवेगळ्या संस्थांची नेमणूक केली आहे. झोन १ मध्ये बोरीवली, ठाणे, पनवेल, पुणे, कोल्हापूरसह १२ आरटीओंचा समावेश आहे. तसेच झोन ३ मध्ये वडाळा, वाशी, सिंधुदुर्ग, नाशिक, सांगली, कऱ्हाडसह २७ आरटीओंचा समावेश आहे.एचएसआरपीची किंमत वाहनाचे प्रकार आणि नंबर प्लेटच्या आकारानुसार वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. नंबरप्लेटसाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. त्याचे शुल्क जीएसटीसह ऑनलाइनच भरावे लागते. त्यानंतर फिटमेंट सेंटरवर जाऊन निवडलेल्या तारखेला आणि वेळेत त्याची फिटिंग करून घ्यावी लागते.
एचएसआरपीसाठी आतापर्यंत ५२ लाख ५० हजारांची ऑर्डर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 11:49 IST